भाजी भरलेला ट्रक पलटल्याने एक ठार; आठ जखमी

0
8
गोंदिया दि.२७: आमगावकडून गोरेगावकडे जाणारे भाजीपाला भरलेले वाहन पलटल्याने एक जागीच ठार झाला तर आठजण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि.२७) दुपारी गोरेगाव तालुक्यातील सोनी-बोटे दरम्यान घडली. मृतकाची नाव अंकित शिवचरण मेश्राम (१८) असे असून जखमींमध्ये राजकुमार चुटे, गणेश भारती, देवेंद्र गिरी, अमोल चुटे यांच्यासह आठजणांचा समावेश आहे.
 शनिवारला गोरेगाव येथे आठवडी बाजार असतो. या बाजाराच्या अनुषंगाने बाजारात भाजीपाल्याचे दुकान लावण्यासाठी आमगाववरून वाहनात भाजीपाला भरून व्यवसायीक मालवाहन क्रमांक एमएच ०८/डब्ल्यू-०१६६ या वाहनाने सोनी-बोटे वरून गोरेगावकडे निघाले. मालवाहक वाहनाच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन पलटी झाले. दरम्यान अंकित शिवचरण मेश्राम (१८) यांसह नऊजण जखमी झाले. उपचारासाठी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात जखमींना नेले असता, उपचारापुर्वीच अंकीतने जगाचा निरोप घेतला. घटनेची माहिती गोरेगाव पोलिसांना प्राप्त होताच, पोलिस निरीक्षक रविंद्र कदम, पोहवा. गणविर आणि इतर कर्मचारी घटनास्थळी पोहचले. जखमी झालेल्यांना तत्काळ उपचारासाठी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले असून उपचार सुरू आहे. घटनेची नोंद गोरेगाव पोलिसांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.
 वृत्तलिहीपर्यंत जखमींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे कळले.