राज्यस्तरीय तपासणी समिती सोमवारी गोंदियात

0
39
OLYMPUS DIGITAL CAMERA

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सिरेगाव बांध, भागी शिरपूर राज्यस्तरासाठी पात्र

  गोंदिया दि. 03संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2018-19 अंतर्गत राज्यस्तरीय समितीमार्फत देवरी पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत भागी (शिरपूर), आणि अर्जूनी मोरगाव पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत सिरेगावबांधची तपासणी करण्यात येणार आहे.

 तपासणी समितीचे अध्यक्ष पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग मंत्रालय मुंबईचे अवर सचिव चंद्रकांत मोरे हे असून, समितीमध्ये कक्ष अधिकारी बाळासाहेब हजारे,  सहाय्यक कक्ष अधिकारी रमेश पात्रे यांचा समावेश आहे. उल्लेखनीय म्हणजे, दोन्ही ग्रामपंचायतींनी विभागस्तरावर संयुक्तपणे द्वितीय क्रमांक पटकावला. त्यामुळे दोन्ही ग्रामपंचायतीची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

            राज्यस्तरीय तपासणी समितीमार्फत सोमवारी (ता. 7) भागी शिरपूर तर मंगळवारी (ता. 8) सिरेगाव बांध या ग्रामपंचायतला राज्यस्तरीय समिती भेट देऊन तपासणी करणार आहे. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान अंतर्गत राज्यस्तरावर प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतीला 50 लाखापर्यंतचा पहिला पुरस्कार प्राप्त होतो. सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन, शुद्ध पाण्याचा पुरवठा, गावातील दृश्यमान स्वच्छता, वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांच्या वापर आणि स्वच्छता, शालेय व अंगणवाडी येथे स्वच्छता सुविधांची सोय आदी विविध विषयांवर गुणांकन केले जाते.

            जिल्ह्यातील दोन्ही गावांना पारितोषिक मिळावे, तथा गावात शाश्वत स्वच्छतेच्या सुविधा राहाव्यात यासाठी, जिल्हा परिषद गोंदिया चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील,पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेश भांडारकर यांच्या मार्गदर्शनात माहिती शिक्षण व संवाद तज्ञ अतुल गजभिये, शालेय स्वच्छता तज्ञ भागचंद्र रहांगडाले विशेष परिश्रम घेत आहेत. गावात शाश्वत स्वच्छता सुविधा राहाव्यात तथा  गावाला पुरस्कार मिळण्यासाठी गावकऱ्यांनी आपले गाव स्वच्छ करण्यावर भर द्यावा, असे आवाहन पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी  नरेश भांडारकर यांनी केले आहे.