पालकमंत्र्यानी घेतला प्रतापगड महाशिवरात्री यात्रा व उर्स तयारीचा आढावा

0
16

सतिश कोसरकर
नवेगावबांध,(गोंदिया)दि. २९ : प्रतापगड येथील महादेव पहाडीवर महाशिवरात्री यात्रा आणि दर्ग्यावरील उर्सनिमित्त ७ ते १५ मार्च दरम्यान भाविक मोठ्या प्रमाणात येणार आहे. भाविकांची या दरम्यान होणारी गैरसोय टाळण्यासाठी विविध यंत्रणांनी पुढाकार घ्यावा. असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
अर्जुनी/मोरगांव तालुक्यातील प्रतापगड येथील ग्रामपंचायत परिसरातील सभा मंडपात महाशिवरात्री यात्रा व ख्वाजा उस्मानगी हारुणी उर्सच्या पूर्वतयारीचा आढावा २७ फेब्रुवारी रोजी पालकमंत्री बडोले यांनी घेतला. यावेळी ते बोलत होते. सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, दिलीप गावडे, उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष रचना गहाणे, पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर, प्रतापगड सरपंच अहिल्या वालदे  उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, यात्रा व उर्स दरम्यान वैद्यकीय पथक २४ तास कार्यरत राहतील याकडे आरोग्य विभागाने लक्ष द्यावे. विद्युत पुरवठा खंडीत होणार नाही याकडे वीज वितरण कंपनीने लक्ष द्यावे व लोंबकाळलेल्या विद्युत तारा व्यवस्थित कराव्या. यात्रेदरम्यान भाविकांना अशुध्द पाणी पुरवठा होणार नाही याची आरोग्य विभागाने काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे पाण्याचे निर्जतुकीकरण करावे. पार्कींगची व्यवस्था गावच्या संयुक्त वन व्यवस्थापन समितीने करावी. ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी विविध स्टॉलधारकांना सूचना द्याव्यात. खाद्य पदार्थाच्या हॉटेल्समधील खाद्यपदार्थ व पिण्याचे पाणी योग्य असल्याचे पाहणी आरोग्य विभागाने करावी.

तत्पूर्वी पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रतापगड महादेव पहाडीवरील मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांचे भूमीपूजन करण्यात आले. सदर काम हे स्थानिक विकास निधीतून करण्यात येणार आहे. पायऱ्यांचे काम पूर्ण झाल्यावर मंदिराकडे दर्शनासाठी ये-जा करणाऱ्या भाविकांना चांगला रस्ता उपलब्ध होणार आहे. प्रतापगड गामपंचायत परिसरात अतिरीक्त केंद्रीय सहायता निधीतून ४ लक्ष रुपये खर्चातून बांधण्यात आलेल्या सभा मंडपाचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
सभेला सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री नंदनवार, पोलिस उपअधिक्षक(गृह) सुरेश भवर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नारायण निमजे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रभारी प्रकल्प अधिकारी मिनाक्षी उन्हाळे, गोंदिया पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. ढोरे, गोंदिया आगार व्यवस्थापक गौतम शेंडे, प्रभारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री रामटेके यांचेसह विविध जिल्हास्तरीय व तालुका स्तरीय यंत्रणांचे प्रमुख अधिकारी यांची उपस्थिती होती.प्रास्ताविक गट विकास अधिकारी नारायण जमईवार यांनी केले. आभार विस्तार अधिकारी भावे यांनी मानले.