संजय कुटी परिसरात सागवन झाडाची कत्तल

0
12
नवेगावबांध, -येथील नवेगावबांध जलाशयाला लागुन असलेल्या जंगलातून २ सागवान झाडांची नुकतीच कत्तल करण्यात आली. नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान मधील संजय कुटी ही बांधाच्या दक्षिण दिशेला आहे. तसेच पहाडी लागून जंगल आहे. मोठ-मोठे सागवानची झाडे आहेत. दरम्यान काही तस्करांनी या परिसरातून या झाडांची कापनी केली आहे. 
नवेगाव राष्ट्रीय उद्यानाकडे पूर्वी संजय कुटीची निगराणी होती तेव्हा रात्रंदिवस चौकीदार राहत होते. त्यावेळेस या सागवन झाडाची वृक्षतोड झाली नाही. नोव्हे.२०१३ मध्ये वनविकास प्रकल्प महामंडळ यांना राष्ट्रीय उद्यान येथील हॉलीडे होम, बालउद्यान, संजय कुटी हस्तातंरित करण्यात आले.
नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान १२ डिसे. २०१३ ला व्याघ्र प्रकल्प घोषित झाल्याने येथील सर्व वनकर्मचारी, चौकीदार यांची बदली जंगलात बिटमध्ये करण्यात आली. व्याघ्र प्रकल्प कार्यालय व वनविकास प्रकल्प महामंडळ यांचे कार्यालयापासुन संजयकुटी ३ कि.मी. अंतरावर आहे. संजय कुटीच्या बाजूला पहाडी व जंगल आहे. परंतु वनविकास प्रकल्प महामंडळ यांना संजय कुटी हस्तातंरित केल्यानंतर या कुटीवर कोणीही कर्मचारी राहत नसल्याने खुलेआम सागवान कटाई सुरू असल्याचे समजते. संजय कुटी जवळून ६०० मीटरवर सागवनची २ झाडे कापण्यात आले. ४.५ फूट गोलाई दोन्ही झाडांच्या बुडाची आहे. दोन्ही झाडांचे आरीने तुकडे केले. सागवन झाडांचे १० ते १५ फुट लांब तुकडे करून नेल्याचे समजते. हे सर्व सागवन झाडे त्या जागेवरून नेण्यात आले. पाच सहा दिवस लोटूनही वनविभाग, व्याघ्र प्रकल्प व वनविकास प्रकल्प महामंडळ यांचे या झाडांच्या वृक्षतोडीकडे दुर्लक्ष होत असून वरिष्ठांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.