तिसऱ्या अखिल भारतीय पोवारी (पवारी/पंवारी) साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून अँड. देवेंद्र चौधरी यांची निवड

0
19

तिरोडा : राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभा भारत प्रणित पवारी साहित्य कला संस्कृती मंडळ भारत तर्फे पांढूर्णा (म. प्र.) आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या अखिल भारतीय पोवारी (पवारी/पंवारी) साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून तिरोडा येथील सुप्रसिध्द (साहित्यिक) कवी, गजलकार, लेखक अँड. देवेंद्र चौधरी यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.
पोवारी (पवारी/पंवारी) बोलीच्या उत्थानासाठी सन २०१८ पासून कार्यरत असलेल्या पवारी साहित्य कला संस्कृती मंडळ भारत (रजि.) च्या वतीने प्रथम अखिल भारतीय पोवारी (पवारी/पंवारी) साहित्य संमेलनाचे आयोजन तिरोडा तालुक्यातील गुमाधावडा येथे केले होते. त्यानंतर दुसरे अखिल भारतीय पोवारी (पवारी/पंवारी) साहित्य संमेलनाचे आयोजन नागपूर येथे केले. आता तिसरे अखिल भारतीय पोवारी (पवारी/पंवारी) साहित्य संमेलनाचे आयोजन पांढूर्णा (म. प्र.) येथे दिनांक ११ डिसेंबर २०२२ रोजी आयोजित केले आहे. या तिसऱ्या अखिल भारतीय पोवारी (पवारी/पंवारी) साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून अँड. देवेंद्र चौधरी यांची सर्वानुमते निवड पवारी साहित्य कला संस्कृती मंडळ भारत (रजि.) च्या आयोजित दिनांक १३/११/२०२२ रोजी बैठकीत झाली आहे.
हे विशेष की, तिरोडा तालुक्यातील एखाद्या कवी, लेखक यांची कोणत्यातरी साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्ष पदी निवड ही पहिल्यांदाच झाली आहे. अँड. देवेंद्र चौधरी हे उत्कृष्ट कवी, गजलकार आहेत. ते हिंदी, मराठी, इंग्रजी मध्ये काव्यलेखन व लेखन करीत असून विशेष करून पोवारी बोलीभाषेत लेख, गजल व कविता लिहितात. मराठी भाषेत “पणन”, हिंदी भाषेत “सफर” व पोवारी बोलीतील “मन को घाव”, “पेंडी” असे सुप्रसिद्ध कवितासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. आता नुकताच पोवारी बोलीतील प्रथम दीर्घकाव्य “थेगरा” प्रकाशित होणार आहे.
अँड देवेंद्र चौधरी यांनी पोवारी बोली व मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासात प्रथमच यवतमाळ येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘मन को घाव ‘ ही पोवारी बोलीची कविता सादर करून इतिहास रचला आहे. तसेच दुसऱ्यांदा उस्मानाबाद येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘ कापसे या जमी ‘ ही पोवारी बोलीची कविता सादर करून पुन्हा इतिहास रचला आहे. तसेच भारत भर आयोजित अनेक हिंदी साहित्य संमेलनात पोवारी बोलीची कविता अँड. देवेंद्र चौधरी यांनी सदर केलेल्या आहेत. हरिद्वार येथे आयोजित आंतररष्ट्रीय कविसंमेलनात पोवारी बोली ची कविता संग्रह सादर करून इतिहास रचला. या कार्यक्रमात त्यांना “काव्यभागिरथ” हा सन्मान बहाल करण्यात आला. अँड. देवेंद्र चौधरी हे निवड पवारी साहित्य कला संस्कृती मंडळ भारत (रजि.) चे राष्ट्रीय सचिव देखील आहेत.
तिरोडा तालुक्यातील मेंदिपूर या लहानशा खेड्यात त्यांचा दिनाक २१ जून १९७८ रोजी जन्म झाला असून लहानपणापासून त्यांना कविता लिहिण्याचा छंद आहे. ह्याबाबत पवारी साहित्य कला संस्कृती मंडळ भारत, याचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टेंभरे व उपाध्यक्ष व पूर्व संमेलनाध्यक्ष अँड. लखनसिंह कटरे तसेच सर्व सदस्यांचे यांचे आभार व्यक्त केले आहे. तिसऱ्या अखिल भारतीय पोवारी (पवारी/पंवारी) साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून अँड. देवेंद्र चौधरी यांची निवड झाल्याने त्यांच्या जन्मगावी व तिरोडा परिसरात आनंदाचे वातावरण असून समाज बांधव तसेच समस्त लोकांनी त्यांचे अभिनंदन केले जात आहे.