जंगली हत्तीचा कळप साकोली तालुक्यात

0
86

साकोली-गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यात जंगली हत्तीच्या कळपाने उच्छाद मांडल्यानंतर हा कळप काल रात्री साकोली तालुक्यातील पापडा, सिरेगाव, झाडगाव, नयनपुर परिसरात रात्रीच्या वेळेस अचानक दाखल झाला व रातोरात अचानक गायब झाल्यामुळे हा हत्तींचा कळप नेमका कोणत्या दिशेने आला व कोणत्या दिशेने गेला याबाबत वन विभागामार्फत शोध सुरू आहे.
साकोली वनपरिक्षेत्रातील सानगडी वनक्षेत्रात रविवारी रात्री हत्तीच्या कळपाचे आगमन झाले असून, थोड्या प्रमाणात शेतकर्‍यांचा नुकसान केले आहे. रात्रीच्या सुमारास हत्तीचा कळप सानगडी वनक्षेत्रातील झाडगाव, केसलवाडा, पापडा, शिरगाव, सिरेगाव गावाशेजारील शेतशिवारात झाली. शेतकर्‍यांनी शेतातील उभे धान पीक कापून त्याचे पुंजणे शेतात ठेवले होते. त्या पुंजणांची या हत्तीचा कळपाने धानाच्या पुंजनाचेसुद्धा नुकसान करण्यात केले आहे. या घटनेची माहिती मिळताच उपवनसंरक्षक राहुल गवई, सहाय्यक वनसंरक्षक रोशन राठोड, वनपरीक्षेत्राधिकारी संजय मेंढे, तहसीलदार रमेश कुंभरे व वनविभाग तथा महसूल विभागाची चमू सानगडी येथे आज तळ ठोकून आहे. हत्तीचा कळप नेमका गेला कुणाकडे याविषयी शोध सुरु आहे. तर महसूल व वनविभाग नुकसानीचे पंचनामे करीत असून, शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी प्रयत्नरत आहे. हत्तीच्या आगमनामुळे या परिसरात भीती व त्यांच्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे हत्ती रात्रीच नुकसान करतात आणि दिवसा त्यांचे लोकेशन मिळत नाही. यामुळे वनविभागपुढे आव्हान आहे. शेतात खरीप पिकांसह आता नव्याने रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. हत्तींचा कळप नेमका कोणत्या जंगलातील कोणत्या भागात आहे. याबाबत सध्या वन अधिकार्‍यांना माहिती नसल्यामुळे आज रात्री वन विभागातर्फे थर्मल ड्रोन द्वारे हत्तींच्या कळपाची माहिती घेतली जाणार असून हत्तींच्या कळपाद्वारे होणारी संभावित हानी टाळता येईल. आज रात्री शोध मोहीम वनविभाग करणार आहे. कान्हेकर, कापगते, हटवार, रामकृष्ण चांदेवार, चाचेरे या शेतकर्‍यांचे ऊस वाडी व धानाचे पुंजणाचे हत्तीच्या कळपाने नुकसान केले आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.