पालकमंत्र्याच्या हस्ते बांबू साठवणूक गोदामाचे भूमिपूजन

0
14

अर्जुनी मोरगाव,दि. ८ : जिल्हयात ३५ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात बांबू आहे. जिल्हयातील बुरड कामगारांचे व बांबू कारागिरांचे जीवन बांबूवर अवलंबून आहे. शासन कौशल्य विकासाला प्राधान्य देत असून जिल्हयातील बांबू कारागिरांनी त्यांच्या कौशल्यातून बांबूपासून विविध साहित्य व वस्तूंची निर्मिती करुन मोठ्या प्रमाणात रोजगार मिळवावा. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले.

अर्जुनी/मोरगांव तालुक्यातील महागाव येथे  सहवनक्षेत्र सहायक कार्यालयाच्या परिसरात बांबू साठवणूक गोदामाचे भूमिपूजन पालकमंत्री यांनी केले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार दयाराम कापगते, उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, जि.प.सदस्य भास्कर आत्राम, जि.प.माजी सभापती प्रकाश गहाणे, उमाकांत ढेंगे, पं.स.सदस्य रामदास कोहाडकर, सरपंच पपिता जांभूळकर, उपसरपंच त्र्यंबक झोडे, बुरड कामगार संस्थेचे अध्यक्ष कैलास वरखडे यांची उपस्थिती होती.

श्री कोहाडकर म्हणाले, बांबू साठवणूक गोदामाचे बांधकाम पावसाळयापूर्वी पुर्ण झाले पाहिजे त्यामुळे बुरड कामगारांना लवकरच तेथे काम करता येईल. प्रास्ताविकातून उपवनसंरक्षक डॉ. रामगावकर म्हणाले, जिल्हयात कोहमारा, मजीदपूर आणि महागांव येथे काष्ठ व बांबू कारागिरांना प्रशिक्षण देण्यासाठी शेड बनविण्यात येणार आहे. जिल्हयात १०० ग्रामवन तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.