महाराष्ट्रात ऊर्जा क्षेत्राचे खासगीकरण होऊ देणार नाही : रवींद्र देवकांत

0
10

गोंदिया : ऊर्जा विभागाचे खासगीकरण झाले तर सामान्य ग्राहक म्हणजेच कृषीविषयक ग्राहक, शेतकरी आणि सामान्य माणूस खासगीकरणामुळे अडचणीत येईल. सरकारकडून शेतकरी, बीपीएल धारक आणि घरगुती ग्राहकासाठी सबसिडी दिली जाते. हा तोटा औद्योगिक आणि उद्योगपती यांना वितरित होणाऱ्या वीजेच्या बिलामधून काढला जातो. मात्र खासगीकरण झाले तर कंपन्यांवर कोणतेही निर्बंध राहणार नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षेत्राचे खासगीकरण होऊ देणार नाही, प्रसंगी रस्त्यावर उतरून शासनाच्या विरोधात एकत्रित लढा देऊ. असे प्रतिपादन प्रमुख वक्ते संघटनेचे सरचिटणीस रवींद्र देवकांत यांनी केले.

वीज वितरण कंपनीचे सेवानिवृत्त कामगार तथा वि.क्षे. तांत्रिक कामगार युनियन गोंदिया वितरण परिमंडळ माजी झोन पदाधिकारी यांचा सेवानिवृत्ती सत्कार सन्मान सोहळाचे औचित्य साधून संघटनेच्या गोंदिया व भंडारा जिल्हा वितरण/पारेषन पदाधिकारी/सभासदांच्या वतिने हा भव्य तांत्रिक कामगार मेळावा विशाल लॉंन गोंदिया येथे पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी संघटनेचे माजी केंद्रीय उपसरचिटणीस जे.आर. घोंगडे होते. तसेच संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष रविदादा बारई, केंद्रीय सरचिटणीस आर.टी. देवकांत, कामगार कल्याण मंडळ विश्वस्त किशोर फाले, माजी केंद्रीय संघटक हरीभाऊ धोटे, कार्यकारी अभियंता कामडे, अतिरीक्त कार्यकारी अभियंता जैन, उपकार्यकारी अभियंता दखने प्रामुख्याने उपस्थित होते.

त्यांनी पुढे महाराष्ट्रातील ऊर्जाक्षेत्रापुढील आव्हाने व खासगीकरणाविरोधात लढा देताना या विषयाला हात घालत सखोल मांडणी करून उपस्थित सभासदांना मार्गदर्शन केले. खासगीकरण आल्यानंतर खासगी कंपन्यांना गरीब वर्गाचे काही देणेघेणे असणार नाही.

वीजेचे दर भरमसाठ वाढतील. विजेच्या दरावर सरकारचे नियंत्रित राहणार नाही. खासगी मालकाना ते अधिकार राहील. सबसिडी बंद झाली व विजेचे दर वाढल्यामुळे शेतकरी, गरीब वीज ग्राहक, छोटे उद्योजक, वाणिज्य व इतर वीज ग्राहक विजेचा वापरु शकणार नाही व वीज ही फक्त श्रीमंताची मक्तेदारी होईल, असेही ते यावेळी म्हणाले.

कार्यक्रमाला उपस्थित असलेले संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष रवी बारई यांनी शासन वीज कर्मचाऱ्यांची व महाराष्ट्रातील जनतेची  दिशाभूल करून जनतेचा मालकीचा वीज उद्योग कसा खासगी  भांडवलदारांच्या हाती देण्यास तयार आहे, यावर मार्गदर्शन केले व शासनाचा खासगीकरणाचा डाव हाणून पाडू असे त्यांनी संघटनेच्या सभासदांना आश्वासीत केले.या वेळी राजू गोंदरे, तांत्रिक पत संस्था भंडाराचे माजी सचिव रमेश महरवड यांचा सेवानिवृत्ती सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन सुखदेव रहांगडाले यांनी केले. आभार अतुल चरडे यांनी मानले. गोंदिया विभागच्या समस्त पदाधिकारी कार्यकर्ते यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. कार्यक्रमाला शेकडो संघटना सभासद उपस्थित होते.