आम्हाला प्रश्न विचारा : १४५६७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा

0
13

 ज्येष्ठांच्या मदतीला एल्डर लाईन !

गोंदिया,दि.16 : घरगुती समस्यांसह ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना या समस्येतून बाहेर काढण्यासाठी एल्डर लाईन उपक्रम केंद्र शासनाच्या मदतीने सुरू करण्यात आला आहे. एल्डर लाईनच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यास ज्येष्ठ नागरिकांना माहिती, मार्गदर्शन, भावनिक आधार आणि मदत या पातळीवर आधार दिला जातो. गेल्या दोन-तीन महिन्यात गोंदिया जिल्ह्यात अनेक ज्येष्ठांना एल्डर लाईनचा आधार मिळाला आहे.

         जिल्ह्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून अनेकांना मूले सांभाळत नाहीत. सून जेवायला देत नाही तर काहींचे नातव त्रास देतात. काही ज्येष्ठांना घराबाहेर करण्याचे प्रकारही घडत आहेत. या सर्व समस्यांच्या सोडवणुकीसाठी केंद्र शासनाच्या अंतर्गत एल्डर हेल्पलाइन सुरू झाली आहे. १४५६७ हा या हेल्पलाइनचा क्रमांक आहे. या क्रमांकावर संपर्क साधल्यास ज्येष्ठांच्या तक्रारीनुसार त्यांची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती एल्डर लाईनचे जिल्हा समन्वयक गणेश शेंडे यांनी दिली. एल्डर लाईन ही राष्ट्रीय हेल्पलाईन आहे. केंद्र शासनाच्या अंतर्गत ही सेवा सुरू आहे. ज्येष्ठांची संख्या मोठी असल्याने मदत कार्यासाठी एल्डर लाईन आहे.

■ माहिती, मार्गदर्शन, भावनिक आधार आणि क्षेत्रीय पातळीवर मदत…
” वृद्धात अथवा ज्येष्ठ नागरिकांना निवास, वृद्धाश्रमाबाबत माहिती हवी असेल तर ती दिली जाते. तुम्ही समस्या मांडा आम्ही मदतीला येऊ. सांस्कृतिक, अध्यात्मिक, कला, करमणुकीबाबत माहिती त्यांना हवी असेल तर दिली जाते. कायदेविषयक माहितीची काही गरज असेल तर तीही दिली जाते. कौटुंबिक स्तरावर विवाद असेल, मालमत्ता बाबत तसेच पेन्शन, सरकारी योजनांची दिरंगाई याबाबतही ज्येष्ठांना मदत केली जाते. वृद्धाश्रम, काळजीवाहक सेवा, विरंगुळा केंद्र याबाबतची माहितीही एल्डर लाईनद्वारे दिली जाते.
■ तुम्ही समस्या मांडा आम्ही मदतीला येऊ…
आम्हाला प्रश्न विचारा, आम्ही आपल्यासाठी पुढे येऊ, आम्ही मार्गदर्शन पुरवतो, आम्ही ऐकत आहोत, असा उपक्रम केंद्र शासना अंतर्गत एल्डर लाईनचा आहे. त्यामुळे ज्येष्ठांना आपल्या समस्या मांडण्यासाठी एल्डर लाईनशी संपर्क साधता येईल, असे जिल्हा समन्वयक गणेश शेंडे यांनी सांगितले.
■ भावनिक आधार आणि मदत…
नातेसंबंध विषयक चिंता भेडसावत असेल, जीवनाबाबतचे व्यवस्थापन, वेळ जात नसेल, ताणतणाव राग याबाबतचे
व्यवस्थापन, मृत्यूपूर्वीचे दस्तऐवज या सर्व अनुषंगाने भावनिक आधार देण्याचे काम हेल्पलाइनचे कर्मचारी करतात. त्यासाठी जेष्ठांना एल्डर लाईन १४५६७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून समस्या मांडावी लागेल.