पाणीपुरीतील विषबाधेने एकाचा मृत्यू

0
11

 देवरी,दि.18- तालुक्यातील ककोडी येथे तीनशेच्या वर लोकांना पाणीपुरी खाल्याने विषबाधा झाल्याचा प्रकार घडला. ही घटना गेल्या मंगळवार (ता.15) रोजी मंडईमध्ये पाणीपुरी खाल्ल्याने घडली असून  पिडीतांवर ककोडीच्या प्राथमिक उपचार केंद्रात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आज सकाळी महेश शामलाल कुवरदादरा (वय 12)या मुलाचा 9 वाजेचा दरम्यान मृत्यू झाला आहे.

सविस्तर असे की, देवरी तालुक्यातील ककोडी या अतिदुर्गम आदिवासी गावात मंढईचे आयोजन करण्यात आले होते. या मंढईत परिसरातील हजारो नागरिक आपल्या पाल्यांना घेऊन मंढईचा आस्वाद घेण्यासाठी आले होते. या मंढईत अनेक खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने लागली होती. अशाच एका पाणीपुरी विक्रेत्याच्या स्टालवरून अनेक लोकांनी पाणीपुरी विकत घेऊन खाल्ली.  काहींनी मिठाई विकत घेऊन खाल्ली. मंढईच्या दुसऱ्या दिवसापासून ककोडी आणि परिसरातील नागरिक व बालकांनी डायरियाचा त्रास जाणवायला लागला. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केद्रात रुग्णांचा लोंढा येऊ लागला. अनेक रुग्णांनी गावातील खासगी डॉक्टरांकडे तर काहींनी बाहेर उपचार घेतल्याचे सांगण्यात येते. याविषयी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. काळे यांचेशी भ्रमणध्वनीवर विचारणा केली असता त्यांनी या घटनेला दुजोरा देत सुमारे 150 रुग्ण तपासल्याचे सांगितले.