मतदार हा लोकशाहीचा आधारस्तंभ- जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे

0
13
  • राष्ट्रीय मतदार दिवस साजरा
  • नवमतदारांना ओळखपत्र वाटप

      गोंदिया,दि.25 : लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी तसेच देशाच्या विकासासाठी मतदार हा अतिशय मोलाचा पायाभूत आधारस्तंभ आहे. मतदारामुळेच लोकशाहीची ओळख आहे, असे मत जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी व्यक्त केले.

       जिल्हाधिकारी कार्यालयात 13 व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. उपजिल्हाधिकारी (निवडणूक) सुभाष चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, जिल्हा नियोजन अधिकारी कावेरी नाखले, गोरेगाव तहसिलदार सचिन गोसावी, जिल्ह्याचे आयकॉन दिव्यांग खेळाडू (राज्यस्तरीय) संजय घारपिंडे यावेळी मंचावर उपस्थित होते.

       जिल्हाधिकारी श्री. गोतमारे पुढे म्हणाले, लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करणे हा आपला अधिकार आहे. मतदान करण्यासाठी तरुणांचा सहभाग असणे आवश्यक आहे. मतदार हा देशाची ओळख बदलवू शकतो, त्यासाठी तरुणांनी मतदानाचा हक्क बजाविणे आवश्यक आहे. मतदान करतांना कुठल्याही प्रकारच्या प्रलोभनाला बळी न पडता, निर्भयपणे व  नि:पक्षपाती मतदान करावे. लोकशाहीची किंमत काय आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे. लोकशाही आणखी सुदृढ करण्यासाठी मतदान करणे ही तरुणांची जबाबदारी आहे. आपण आपले हक्क मागण्यासाठी आपली जबाबदारी काय आहे याची तरुणांना जाणीव असायला पाहिजे. तरुण युवक या देशाचे भविष्य आहेत. नवमतदारांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

         भारत निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. मतदारांना सुविधा देण्यासोबतच लोक सहभाग वाढावा यासाठी आयोग नेहमीच प्रयत्नशील आहे. लोकांमध्ये लोकशाही मूल्य रुजावी यासाठी सुध्दा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार मतदारांनी मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे. यापुर्वी वर्षातून एकदाच मतदार नोंदणी व्हायची, परंतू आता वर्षातून चारदा म्हणजेच प्रत्येक तीन महिन्यात मतदार नोंदणी होणार आहे. ज्या युवकांनी 17 वर्ष पूर्ण केलेली आहेत किंवा ज्यांचे वय 17 ते 18 वर्षाच्या दरम्यान आहे अशा नवयुवकांना मतदार म्हणून अग्रीम नोंदणीची संधी निवडणूक आयोगाने उपलब्ध करुन दिलेली आहे. नविन मतदारांना आता स्पीड पोष्टद्वारे मतदार ओळखपत्र घरपोच मिळणार आहे. अशी माहिती प्रास्ताविकातून उपजिल्हाधिकारी (निवडणूक) सुभाष चौधरी यांनी दिली.

          राष्ट्रीय मतदार दिनानिमीत्त भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या संदेशाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. आयोगाने केलेल्या विविध प्रकारच्या उपाययोजना व मतदारांसाठी सुविधांची माहिती त्यांनी आपल्या संदेशात दिली.

         मतदानाइतके अमूल्य नसे काही, बजावू हमखास मताधिकार आम्ही ही 13 व्या राष्ट्रीय मतदार दिवसाची थीम ठेवण्यात आली होती. यावर आधारित आजचा दिवस मतदार दिन म्हणून जिल्हाभर साजरा करण्यात आला.

        लोकशाहीचे अस्तित्व टिकविण्यासाठी तसेच मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदान करणे आवश्यक आहे. मतदान करणे हे आपले शस्त्र आहे. मतदानाबद्दल जागरुकता वाढवू या असे आवाहन अपर कोषागार अधिकारी ल.ही.बाविस्कर यांनी केले.

        25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस जिल्हाभर साजरा करण्यात येत आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनांचे बी.एल.ओ.नी काटेकोरपणे पालन करावे. गरुड ॲपचा वापर करावा. सर्वांनी मतदानाचा हक्क बजवावा असे गोरेगाव तहसिलदार सचिन गोसावी यांनी सांगितले. यावेळी बी.एल.ओ. संघटनेचे अध्यक्ष प्रविण कोचे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

        यावेळी मतदार प्रक्रियेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल गोरेगाव तहसिलदार सविन गोसावी यांचा तसेच स्वीप कार्यक्रमाअंतर्गत उत्कृष्ट कार्य करणारे एस.व्ही.कनपटे, आर.जी.बोंबार्डे, सुरेश भावे, उमेशकुमार बावनकर, माया कठाणे, दिनेश पटेल, भिमराव साखरे, लक्ष्मी बन्सोड, धर्मेन्द्र बघेल, सविता मजुमदार त्याचप्रमाणे नवमतदार अमिशा उपराडे, अश्वीनी बनोटे, आदित्य वालदे, गायत्री अंबुले यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

        कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार नायब तहसिलदार अप्पासाहेब व्हनकडे यांनी मानले. कार्यक्रमास जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास) श्रीराम पाचखेडे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी धनंजय देशमुख यांचेसह नवमतदार बहुसंख्येने उपस्थित होते.