विधानसभाक्षेत्रात प्रत्येकी २५ लाखाचे ३२ महिला बचत भवन बनविणार

0
32

■ आमदार सहसराम कोरोटे यांची घोषणा.

देवरी,ता.२५:  बचत गटातील महिलांना एकत्र बसून चर्चा करता यावी, यासाठी देवरी-आमगाव मतदार संघात प्रत्येकी २५ लाख रूपये खर्चून ३२ बचतभवन निर्माण करणार असल्याची घोषणा आमदार सहसराम कोरोटे यांनी देवरी येथे बोलताना केली.

स्थानिक सीताराम मंगल कार्यालयात गेल्या सोमवारी (दि.23) सीमा कोरोटे तथा महिला कॉंग्रेसच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात ते बोलत होते.

या मेळाव्याचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य ऊषा शहारे ह्या होत्या. मेळाव्याचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या सीमा कोरोटे यांचे हस्ते करण्यात आले. द्वीप प्रज्ज्वलन जि.प. सदस्य राधिका धरमगुळे यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सहराम कोरोटे, माजी जि.प. सदस्य माधुरी कुंभरे, देवरी तालुका महिला कांग्रेस अध्यक्ष सुनंदा बहेकार, माजी तालुका अध्यक्ष राधेशाम बगडिया, नवनियुक्त देवरी शहराध्यक्ष ओमप्रकाश रामटेके, जिल्हा आदिवासी आघाडीचे नवनियुक्त अध्यक्ष सोनू नेताम, पं.स.सदस्य प्रल्हाद सलामे, रंजित कासम, भारती सलामे, अनुसया सलामे, नगरसेवक शैंकी भाटिया, बबलु कुरैशी, नगरसेविका सुनिता शाहू आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार कोरोटे म्हणाले की, विधानसभा क्षेत्रातील लोकांच्या विविध समस्या आहेत. बचत गटातील महिलांना एकत्रित बसून चर्चा करण्यासाठी जागा उपब्ध नाही, अशी महिलांची गेल्या अनेक दिवसापासून तक्रार होती. बचत गटातील महिलांसाठी एखादे हक्काचे बचत भवन असले पाहिजे. यासाठी संपूर्ण विधानसभा क्षेत्रात प्रत्येकी २५ लाख रूपये खर्चून एकूण ३२ महिला बचत भवन तयार करण्याचा मानस आहे.
दरम्यान, सीमा कोरोटे व महिला कॉंग्रेसच्या वतीने तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा  शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाची सांगता उपस्थित सर्व महिलांना हळदी कुंकू, वान वाटप, तीळ-गूळ व अल्पोहाराने करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनंदा बहेकार यांनी केले.  संचालन सचिन मेळे व किरण राऊत यांनी तर उपस्थितांचे आभार अर्चना नरवरे यांनी मानले.
या मेळाव्याला देवरी तालुक्यातील सर्व नवनिर्वाचीत सरपंच,उपसरपंच,ग्रा.पं. सदस्य व पक्षाचे कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.