‘जैवविविधता उद्याना’चे रविवारी भूमिपूजन

0
9

नागपूर : वन विभागाने अंबाझरी येथील आपल्या ७५0 हेक्टर जमिनीवर जैवविविधता उद्यान (बायोडायव्हर्सिटी पार्क) विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाचे रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी ९.३0 वाजता भुमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) टी. एस. के. रेड्डी यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.
कमलानगर, हायवे ग्लोरी हॉटेलशेजारी होणार्‍या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे वित्त, नियोजन व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार राहणार आहेत. तसेच अतिथी म्हणून पालकमंत्री तथा राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह महापौर प्रवीण दटके, जिल्हा परिषद अध्यक्षा निशाताई सावरकर, आमदार समीर मेघे, राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) ए. के. निगम, महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सर्जन भगत, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्री भगवान, विभागीय आयुक्त अनुप कूमार, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन) ए. एस. के. सिन्हा, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक व केंद्रस्थ अधिकारी डॉ. सुरेश गैरोला आणि नगरसेवक परिणय फुके उपस्थित राहतील. विशेष म्हणजे, हा प्रकल्प उपराजधानीच्या सौंदर्यात भर घालणारा ठरणार आहे. या प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती देताना रेड्डी म्हणाले, यावर सुमारे १४ कोटी ३४ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. जैवविविधता उद्यानात प्रामुख्याने नक्षत्र वन आणि शिव वनचा समावेश असेल. तसेच येथे साकारण्यात येणारे हर्बल आणि रॉक गार्डन नागपूरकरांचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.