“हत्तीरोग” सार्वत्रिक औषधोपचार मोहिम १० फेब्रुवारी पासून सुरु

0
8

गोंदिया, दि.9: राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत शासन स्तरावरुन हत्तीरोगाच्या दुरीकरणाकरीता १० फेब्रुवारी २०२३ ते २० फेब्रुवारी २०२३ या कालावधीदरम्यान गोंदिया जिल्हयात सार्वत्रिक औषधोपचार मोहिम राबविण्यात येणार आहे. सन २०२३ मध्ये ही मोहिम गोंदिया, तिरोडा, गोरेगाव व अर्जुनी मोरगाव फक्त या ४ तालुक्यात राबविण्यात येणार असून सदर तालुक्यांची निवड ही नोव्हेंबर महिण्यात झालेल्या हत्तीरोग संसर्ग मुल्यांकन सर्वेक्षणानुसार (transmission assessment survey) करण्यात आलेली आहे.

या सर्वेक्षणात हत्तीरोगाची संसर्गात्मक स्थिती आढळून आलेली नाही असे तालुके या मोहिमेतून वगळण्यात आले आहे. इतर ४ तालुक्यांमध्ये हत्तीरोग हा संसर्गात्मक स्थितीमध्ये आढळून आलेला आहे. म्हणजेच हत्तीरोगाचा प्रसार हा त्या भागात सुरु असून नविन रुग्ण दुषित आढळून आलेले आहे. त्या अनुषंगाने गोंदिया, तिरोडा, गोरेगाव व अर्जुनी मोरगाव या तालुक्यांचा समावेश सन २०२३ च्या हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेत करण्यात आलेला आहे. दरवर्षी प्रमाणे या ४ तालुक्यात सदर मोहिमेदरम्यान डी.ई.सी व अलबेंडाझोल गोळयांची एकच मात्रा आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत वाटप करण्यात येणार आहे. या गोळयांच्या सेवनाकरीता लाभार्थ्यांची निवड करतांना दोन वर्षाखालील बालके, गरोदर माता व अती गंभीर आजारी रुग्णांना वगळून इतर सर्वांची निवड करण्यात येते.
सदर गोळयांची मात्रा ही लाभार्थ्यांच्या वयोगटानुसार असून या गोळयांचे सेवन हे लाभार्थ्यांनी गोळया वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांसमोरच करायचे आहे. जेणेकरुन निवडण्यात आलेल्या संपुर्ण लाभार्थ्यांनी गोळया सेवन केल्या आहे याची १०० टक्के पुष्ठी आरोग्य विभागाला होईल. १० फेब्रुवारी २०२३ रोजी या मोहिमेची सुरुवात ही बुथव्दारे गोळया वाटप करुन करण्यात येणार आहे. यामध्ये ऑफीस, शाळा, औद्योगीक ठिकाण ज्या ठिकाणी लाभार्थी भरपूर प्रमाणात उपस्थित असतात अशा ठिकाणांपासून करण्यात येणार आहे. त्यानंतर ११ फेब्रुवारी २०२३ पासून सदर मोहिमेत घरोघरी जाऊन आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गोळया वाटप करण्यात येणार आहेत.

गोळया घेतांना लाभार्थ्यांनी जेवन किंवा नास्ता करणे गरजेचे आहे. या गोळ्यांचा कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही. क्वचीत प्रसंगी ज्या व्यक्तिमध्ये हत्तीरोगाचे कृमी/ जंतू असतात त्यांनी ही औषध खाल्यानंतर शरीर दुखने, उलटी, डोके दुखणे, ताप, शरीरावर लाल चट्टे व खाज होऊ शकते. परंतु ही लक्षणे तात्पुरती स्वरुपाची असतात आणि ती आपोआप जातात. उपरोक्त लक्षणे दिसताच संबंधीतांनी आरोग्य कर्मचारी किंवा जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात संपर्क साधावा. जेव्हा डी.ई.सी व अलबेंडाझोल गोळया खाऊ घालण्याकरीता आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, आशा कार्यकर्ता व स्वयंसेवक वरील तारखांना येतील तेव्हा या गोळया जेवन करुनच (उपाशी पोटी न घेता) घेण्यात याव्या. तसेच वाटप करण्यात आलेल्या गोळया घरी साठवून न ठेवता आरोग्य कर्मचाऱ्यांसमोरच सेवन करुन शासनाच्या या मोहिमेस प्रतिसाद द्यावा व हत्तीरोगाच्या दुरीकरणाकरीता सर्वानी सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितिन वानखेडे तसेच जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे यांनी केले आहे.

आरोग्य विभागातर्फे १० फेब्रुवारी २०२३ पासून सुरु होणाऱ्या सार्वत्रिक हत्तीरोग औषधोपचार मोहिमे अंतर्गत वितरीत करण्यात येणारे गोळयांचे काहीही दुष्परिणाम होत नाही. तसेच हत्तीरोग हा आजार लागण झाल्यानंतर त्यावर कुठलाही खात्रीशीर उपाय नसून फक्त प्रतिबंधात्मक उपाय म्हणून या गोळयांचे सेवन करणे हाच एकमेव उपाय आहे. करीता नागरीकांनी सदर गोळयांचे मनात काहीही शंका न बाळगता सेवन करावे.

चिन्मय गोतमारे, जिल्हाधिकारी

आरोग्य विभागातर्फे १० फेब्रुवारी २०२३ पासून सुरु होणाऱ्या सार्वत्रिक हत्तीरोग औषधोपचार मोहिमे अंतर्गत वितरीत करण्यात येणाऱ्या हत्तीरोग प्रतिबंधात्मक गोळ्यांचे मी स्वतः सर्वा समक्ष सेवन केले असून सदर गोळयांपासून कोणताही दुष्परीणाम जाणवला नाही. करीता जिल्हयातील सर्व नागरीकांनी हत्तीरोग प्रतिबंधात्मक गोळयांचे सेवन करावे व आरोग्य विभागतर्फे राबविण्यात येणाऱ्या मोहिमेला १०० टक्के यशस्वी करावे.

अनिल पाटील
मुख्य कार्यकारी अधिकारी,

एकदा हत्तीरोग बळावल्यावर उपाय नाही तेव्हा हत्तीरोग होवू नये म्हणून डी.ई.सी. व अलबेंडाझोल गोळयांची फक्त एक मात्रा वर्षातून एकदा “हत्तीरोग” दिनी अशी सलग ५ वर्षे खाल्यास हत्तीरोग होत नाही. त्यामुळे हत्तीरोगाचा प्रसार होणे थांबते व पर्यायाने आपण स्वतः व आपली भावी पिढी हत्तीरोगापासून मुक्त राहू शकेल.

डॉ. वेदप्रकाश चौरागडे
जिल्हा हिवताप अधिकारी