प्रतापगड यात्रेनिमित्त वाहतूक व्यवस्थेत तात्पुरता बदल

0
15

 गोंदिया,दि.16 : जिल्ह्यात मौजा प्रतापगड येथे १८ ते २३ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत “महाशिवरात्री” निमित्ताने यात्रा होणार आहे. सदर यात्रेत मोठ्या संख्येने भाविक येतात. सदर ठिकाणी भाविकांची व त्यांचे वाहनांची प्रचंड गर्दी होते. सदर ठिकाणी वाहतुकीकरीता असलेला रस्ता हा अरुंद असल्याने त्या परिसरात मोठया प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते. ही बाब लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने वाहतुकीच्या मार्गात तात्पुरता बदल केला आहे. याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी प्रसिद्ध केली आहे. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांनी याची नोंद घ्यावी.

         यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यात्रेतील भाविकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास किंवा त्यांची गैरसोय झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे पोलीस अधिक्षक, गोंदिया यांनी जिल्हा प्रशासनास कळविले आहे. त्यानुसार सदर यात्रेदरम्यान सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने, भाविकांच्या जीवितास धोका होवू नये, त्यांची गैरसोय होऊ नये याकरीता गोंदिया जिल्ह्यातील मौजा प्रतापगड येथील महाशिवरात्री निमित्ताने होणाऱ्या यात्रेच्या अनुषंगाने १८ फेब्रुवारी २०२३ रोजी ०५.०० वा. ते  २३ फेब्रुवारी २०२३ रोजी २१.०० वा. पर्यंत सुकळी फाट्याकडून प्रतापगड येथे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना परत सुकळी फाट्याकडून जाण्याबाबत तात्पुरते मनाई आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत.

           तसेच उपरोक्त नमूद कालावधीत सर्व वाहने प्रतापगड येथून परत जातेवेळी प्रतापगड टी पॉईंट – गोठणगाव या मार्गाने वळविण्याचे आदेश जारी करण्यात येत आहे. उपरोक्त आदेशाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभाग, गोंदिया यांनी प्रभारी अधिकारी, पो.स्टे. केशोरी, गोंदिया यांच्या मदतीने आवश्यक त्या ठिकाणी सूचनात्मक वाहतूक चिन्हे, बोर्ड लावून घ्यावेत असेही अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. सदरची अधिसुचना १८ फेब्रुवारी २०२३ रोजी ०५.०० वा. ते  २३ फेब्रुवारी २०२३ रोजी २१.०० वा. पर्यंत अंमलात येईल.