अनिष्ट प्रथा व व्यसनाविरुद्ध समाज जागृती करा – विनोद मोहतुरे

0
22
  • जादुटोणा विरोधी कायदा व नशामुक्ती बाबत मार्गदर्शन शिबीर
    विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गोंदिया,दि.17 : अनिष्ट अघोरी प्रथा, जादूटोणा तथा व्यसनाधिनता समाजाला लागलेली कीड असून अशा प्रकारापासून आजची पिढी दूर राहिली तरच समाजाची प्रगती होईल. महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य असून आपल्या राज्यात अशा प्रथांना थारा नाही. नागरिकांनी व तरुण-तरुणींनी याबाबत समाजात जागृती निर्माण करावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी केले.

१६ फेब्रुवारी २०२३ रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गोंदिया येथे जादुटोणा विरोधी कायदा व नशामुक्ती बाबत मार्गदर्शन शिबीर व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

 सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे गटनिदेशक प्रेम कटरे हे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन सहायक आयुक्त, समाज कल्याण विनोद मोहतुरे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. प्रकाश धोटे, समन्वयक, जादुटोणा विरोधी कायदा समिती व  शुद्धोधन शहारे, जिल्हा समन्वयक, नशामुक्ती मंडळ, महाराष्ट्र राज्य व प्रमुख अतिथी म्हणून जी.के.पटले, निदेशक, श्रीमती खापरे, निदेशक, श्री सावलानी, निदेशक उपस्थित होते.

सामाजिक न्याय विभागामार्फत महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट, अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समुळ उच्चाटन करण्याबाबत कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व प्रचार आणि प्रसिद्धीकरीता जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती, प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी जिल्हास्तरीय समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यानुसार जाटुटोणा विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याकरीता जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थ्यांना सदर कायद्याची माहिती तथा प्रशिक्षण देण्यात येते. सामाजिक न्याय विभागाअंतर्गत नशामुक्ती मंडळ तसेच विविध व्यसनमुक्ती केंद्रामार्फत समाजातील व्यसनाधीन तरुणांचे प्रमाण कमी करण्यासाठी नशामुक्तीबाबत समुपदेशन व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात येते.

 डॉ. प्रकाश धोटे यांनी जादुटोणा विरोधी कायदा व समाजातील विविध जादुटोणा अघोरी प्रथा, अंगात देव येणे, भूतबाधा होणे इत्यादी बाबत सविस्तर माहिती दिली तसेच विविध चमत्कार दाखवून मांत्रिक लोक कशा पद्धतीने लोकांना फसवून लुबाडणूक करतात याबाबत प्रात्यक्षिके दाखविले. शुद्धोधन शहारे यांनी समाजातील व्यसनाधीनता व त्यांचे गंभीर दुष्परीणाम यावर उपस्थित विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले. आजच्या घडीला चिंतेचा विषय असलेल्या सोशल मिडिया सुद्धा व्यसन असुन या व्यसनाचे दुष्परीणाम यावर मार्गदर्शन करुन नशामुक्तीची शपथ घेण्यात आली.

कार्यक्रमाचे संचालन जी.के.पटले, निदेशक यांनी केले. कार्यक्रम यशस्विरित्या पार पाडण्याकरीता लक्ष्मण खेडकर, आत्माराम खंडाते व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गोंदिया येथील कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. सदर मार्गदर्शन शिबीर व कार्यशाळेचे वेळी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गोंदिया येथील शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी व ९१७ प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते.