हॉटेल व रेस्टोरंटमधील मेन्यूमध्ये भरड या धान्याचा समावेश करा- सहायक आयुक्त अ.प्र.देशपांडे

0
14

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष

गोंदिया,दि.17 : आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त राज्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अनुषंगाने जिल्ह्यातील हॉटेल व रेस्टोरंटमधील मेन्यूमध्ये भरड धान्याचा समावेश करावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त अ.प्र.देशपांडे यांनी केले आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केल्याप्रमाणे राज्यात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ साजरे करण्यात येत आहे. पौष्टिक तृणधान्यामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, कोडो, कुटकी, सावा, राळा आणि राजगिरा आदि पिकांचा समावेश आहे. ही सर्व पौष्टिक तृणधान्ये लोह, कॅल्शियम, झिंक, आयोडीन सारख्या सूक्ष्म पोषक घटकांनी समृद्ध आहे. पौष्टिक तृणधान्य डायरीया, बध्द कोष्टता, आतड्यांच्या आजारावर प्रतिबंध करतात. तसेच या तृणधान्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने मधुमेह, हृदयविकार, ॲनिमिया उच्च रक्तदाबरोधक आहेत. पौष्टिक तृणधान्य आधारित पदार्थ कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यास सक्षम असल्याने आहारामध्ये त्यांना अनन्यसाधारण महत्व आहे.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्याचे लोकांच्या आहारातील प्रमाण वाढविण्यासाठी त्याचा प्रचार, प्रसिद्धी होणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे करण्यासाठी केंद्र शासनाने प्रत्येक राज्यास एक विशिष्ट महिना नेमून दिला आहे. महाराष्ट्र राज्यासाठी फेब्रुवारी २०२३ हा महिना नेमून दिला आहे. मिलेट ऑफ मंथन नुसार फेब्रुवारी महिना हा ज्वारी पिकासाठी समर्पित केला आहे. तृणधान्याच्या उपयोगामुळे ग्राहकांना पौष्टिक अन्न पदार्थ उपलब्ध होऊ शकतील, त्यांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होईल. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व हॉटेल, रेस्टोरंटमध्ये तयार होणाऱ्या पदार्थांमध्ये ज्वारी, बाजरी आणि इतर भरड धान्याचा उपयोग करावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन, गोंदियाचे सहायक आयुक्त अ. प्र.देशपांडे यांनी केले आहे.