अंगणवाडी सेविकांचा सहाव्या दिवशीही संप सुरूच

0
34

गोंदिया-महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीच्या वतीने अंगणवाडी सेविका यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरात सोमवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपाचा आज सहावा दिवस असून, यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. मात्र या संपाचा फटका लाखो बालकांना बसत आहे. कारण अंगणवाडी बंद असल्याने सहा वर्षापर्यंतची बालके पोषण आहारापासून वंचित राहत आहेत. वेतनश्रेणी लागू करणे किंवा मानधनात वाढ करणे, पेन्शन लागू करणे आदी प्रमुख मागण्यांसाठी २० फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात अंगणवाडी कर्मचारी संघटनांच्या कृती समितीने अंगणवाडी सेविका-मदतनिस यांनी बेमुदत राज्यव्यापी संप पुकारलेला आहे. दरम्यान, या काळात राज्यातील अंगणवाड्या बंद करून सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस संपात सहभागी झाल्या आहेत.गोंदिया  जिल्ह्यात आयटक नेते हौसलाल रहागंडाले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरु आहे.
माहितीनुसार, अमरावतीमध्ये अंगणवाडी सेविका संपावर निघाल्या आहेत आणि यामुळे या जिल्ह्यातील १ लाखाच्यावर  चिमुकले पोषक आहारापासून वंचित आहेत. तसेच, अमरावती जिल्ह्यातील 1833 अंगणवाडी सेविका व 1411 मदतीनस संपावर गेल्या आहेत. त्यामुळे 1665 अंगणवाडी केंद्र सध्या बंद आहेत. दरम्यान, आयटकच्यावतीने सोमवारपासूनच जिल्ह्यातील सर्व तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयासमोर निदर्शने करुन शासनाचे लक्ष वेधण्यात येत आहे.देवरी येथे आमदार सहसराम कोरेटे,सडक अर्जुनी येथे आमदार मनोहर चंद्रिकापूरे,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर आदींनी या आंदोलनात सहभागी होत आपला पाठिंबा दर्शविला.तसेच शासनाकडे मागण्यांकरीता पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.