जिल्हा विधी सेवा प्राधिकरणद्वारे मराठी भाषा संवर्धन दिनानिमित्त कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

0
8

गोंदिया, दि.2 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय गोंदिया, जिल्हा वकील संघ गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी मराठी भाषा संवर्धन दिनानिमित्त कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा व सत्र न्यायालय गोंदिया येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष ए.टी. वानखेडे होते. तसेच कार्यक्रमाला उपस्थित असलेले ॲडव्होकेट आरती भगत, उपाध्यक्ष जिल्हा वकील संघ, सकलेश पिंपळे सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच आर.एस. कानडे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर गोंदिया, प्राध्यापिका डॉ. कविता राजाभोज मराठी भाषा विभाग एस.एस. गर्ल्स कॉलेज गोंदिया हे प्रामुख्याने उपस्थित होते.

            प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष ए.टी. वानखेडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये कार्यालयात दैनंदिन वापरामध्ये मराठी भाषेचा असलेला वापर या विषयावर उपस्थितांना विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच प्रत्येक शासकीय कार्यालयाने आपल्या कामकाजात मराठी भाषेचा वापर करायला हवा असे सांगितले.

           कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आर.एस. कानडे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर गोंदिया यांनी आपल्या भाषणामध्ये मराठी भाषा गौरव दिन किंवा मराठी भाषा संवर्धन दिन हा कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म्हणून आपण साजरा करतो. मराठी भाषा ही बाळबोध /देवनागरी लिपी भाषा असून प्राचीन संस्कृती पासून तिचे महत्व अधोरेखित आहे असे सांगितले.

      प्राध्यापिका डॉ. कविता राजाभोज यांनी आपल्या भाषणामध्ये मराठी ती तू का मेळावा या शब्दांनी सुरुवात केली. पुढे त्यांनी मराठी भाषेबद्दल समाजात असलेला गैरसमज या विषयावर उपस्थितांना विस्तृत मार्गदर्शन केले.

          कार्यक्रमाला गोंदिया येथील सर्व न्यायीक अधिकारी, न्यायालयीन कर्मचारी तसेच वकील वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ॲड. प्रणिता कुलकर्णी यांनी केले तर उपस्थितांचे आभार ॲड. मंगला बनसोड यांनी मानले.