दिव्यांग मुलांना लोकली मेड साहित्य देण्याकरिता मोजमाप शिबिराचे आयोजन

0
23

– समग्र शिक्षा व DEIC चा संयुक्त उपक्रम.
गोंदिया,दि.08ः- जिल्हयातील अस्थिव्यंग, मतिमंद, सेरेब्रल पाल्सी व बहुविकलांग असलेल्या दिव्यांग मुलांना लोकली मेड साहित्य देण्याकरिता के. टी. एस. जिल्हा सामान्य रुग्णालयात असलेल्या जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्रातील तज्ञांच्या मार्गदर्शनात मोजमाप शिबिराचे आयोजन दिनांक 9 ते 11 मार्च 2023 या कालावधी मध्ये बाई गंगाबाई रुग्णालयात करण्यात आले असल्याची माहिती समग्र शिक्षाच्या दिव्यांग विभागाने जिल्हा समन्वयक विजय ठोकणे यांनी दिली आहे.
दिव्यांग मुलांचे स्नायू ताठरले असल्यामुळे त्यांना दैनंदिन जीवनात तसेच शालेय शिक्षण घेतांना अडचणी येतात. त्यामुळे ही अडचण दुर करण्यासाठी त्यांना त्यांच्या शारीरिक क्षमतेनुसार व गरजेनुसार मोजमाप करून साहित्य दिल्यास फार मोठी मदत अश्या मुलांना होतें.
याच अनुषंगाने येत्या 9 तारखेपासून तीन दिवस जिल्हयातील 159 मुलांकरीता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात 9 मार्च रोजी आमगाव, अर्जुनी/मोरगाव व देवरी तालुक्यांची लाभार्थी येतील, 10 मार्चला गोंदिया व गोरेगांव तर 11 मार्चला सालेकसा, सडक/अर्जुनी व तिरोडा चे विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. शिबिरात शासकीय रुग्णालयाच्या फिजिओथेरपिस्ट डॉ.कांचन भोयर व डॉ.प्रगती मनोहर सेवा देणार आहेत. सदर शिबिर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरीश मोहबे व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. महेन्द्र गजभिये यांच्या मार्गदर्शनात पार पडणार असल्याची माहिती जिल्हा समन्वयक विजय ठोकणे व DEIC चे व्यवस्थापक पारस लोणारे व अजित सिंह यांनी दिली आहे.