काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या भावासह पाच जणांवर अखेर गुन्हा दाखल

0
171

डॉ. साळवे यांचे अपहरण प्रकरण
गडचिरोली : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे भाऊ विनोद पटोले यांच्यासह पाच व्यक्तींवर डॉ. प्रमोद साळवे यांना गडचिरोली-चातगाव मार्गावरील बोदली गावाजवळ त्यांची गाडी अडवून अपहरण , मारहाण व शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहिता कलम ३४१, १४३, ५०४, ५०६ अंतर्गत सोमवार ६ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
डॉ. प्रमोद साळवे यांची बहिण अल्का रामणे यांच्या नावाने धानोरा तालुक्यातील कटेझरी येथे असलेल्या राईस मिलची खरेदीचा तोंडी सौदा जेसा मोटवानी रा. देसाईगंज यांच्या मध्यस्थीने ५१ लाख रुपयांत करून रजिस्ट्री करण्याचा ठराव केला होता. दरम्यान, विनोद पटोले यांनी टप्प्याटप्प्याने २० लाख रुपयांचा धनादेश दिला. मात्र, सहा महिन्यांची मुदत उलटून गेल्यानंतर त्यांनी मील व जमिनीबाबत कोणताही व्यवहार नसल्याने वारंवार विचारणा केली. परंतु, विनोद पटोले यांच्याकडून सकारात्मक विचार दिसून न आल्याने त्यांना वकिलामार्फत १६ जानेवारीला नोटीस पाठवून व्यवहार करा, अन्यथा सौदा रद्द झाला असे समजण्यात येईल व सौद्यापोटी देण्यात येणारी रक्कमही परत देण्यात येणार नाही, अशा आशयाची नोटीस विनोद पटोले यांना देण्यात आली. ३ मार्च रोजी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान डॉ. साळवे आपल्या गाडीसह चातगाववरून गडचिरोलीकडे कामासाठी येत असताना, बोदली राईस मिलजवळ मागेहून भरधाव वेगाने वाहन क्रमांक एमएच ३१ एफई ९०९७ अचानक समोर येऊन थांबली. या गाडीत पाच व्यक्ती होते. त्यांनी गाडीतून उतरून धमकी देऊन आपल्याला शिवीगाळ व अपहरणाचा प्रयत्न केला. यात विनोद पटोले यांच्यासह आरमोरी येथील काँग्रेसचे युवानेते छगन शेडमाके, माजी पोलीस अधिकारी दामदेव मंडलवार, नागपूर येथील सुमित कोठारी यांचा समावेश होता. त्यांनी राईस मिल आपल्या नावाने करून दिली नाही तर ‘काट डालूंगा, मार डालूंगा’ अशी धमकी दिली. तर सुमित कोठारी यांनी ‘राईस मिल जला देंगे’ व छगन शेडमाके यांनी ‘राईस मिलके साथ इसको भी जला दो’ अशी धमकी दिली. यावेळी दामदेव मंडलवार यांनी मोठ्याने ओरडून ‘गाडीत बसा’ असे म्हणाले. सदर घटनेमुळे घाबरून सोबत असलेल्या साथीदारांच्या मदतीने सरळ गडचिरोली पोलीस स्टेशन गाठून याबाबत रिपोर्ट दाखल केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी सुमित कोठारी, विनोद पटोले, छगन शेडमाके, दामदेव मंडलवार व एक अनोळखी व्यक्ती अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सदर व्यक्तींना पोलीस अटक कधी करतात, याकडे लक्ष लागले आहे.

 काँग्रेसच्या दबावानंतरही पोलिसांकडून गुन्हा दाखल
सदर प्रकरणातील विनोद पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे मोठे भाऊ असून ते सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक होते. तर, छगन शेडमाके काँग्रेसचे युवानेते असल्याने काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरून पोलिसांवर गुन्हा दाखल करू नये, म्हणून प्रचंड दबाव असल्याची माहिती होती. तरीही पोलीस अधीक्षक यांनी याप्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षकांना तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यामुळे यापुढे गुन्हेगारीला निश्चितच आळा बसून सामान्य जनतेला न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.