वृक्षतोड प्रकरणाची समितीने केली चौकशी,कारवाईकडे लागले लक्ष

0
52

सेजगाव येथील वृक्षतोड विक्री प्रकरण

गोंदिया : तिरोडा तालुक्यातील सेजगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात असलेल्या वृक्षांची कत्तल करून त्या वृक्षांची विक्री केल्याचे प्रकरण समोर आले होते. या बाबत बेरार टाईम्सने ४ मार्चला आरोग्य उपकेंद्रातील वृक्षांची कत्तल करून विक्री या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्या वृत्ताची दखल घेत आज ८ मार्च रोजी तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत चौकशी समितीने घटनास्थळी येवून प्रकरणाची चौकशी केली. तसेच चौकशी अहवाल येत्या काही दिवसात जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे सादर करणार असल्याचे ग्रामपंचायतीला सांगितले. त्यामुळे सदर वृक्षतोड करणार्‍या कर्मचार्‍यांवर प्रशासन कोणती कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे.
सविस्तर असे की, सेजगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात सद्या स्थितीत एक आरोग्य सेविका तसेच एक सीएचओ कार्यरत आहेत. तर काही दिवसापूर्वीच एका आरोग्य सेविकेचा पदोन्नतीपर स्थानांतरण झाले. पदोन्नतीपर स्थानांतर झालेल्या सेविका या मागील १५ ते १७ वर्षापासून याच उपकेंद्रात कार्यरत होत्या. दरम्यान त्यांनीच या झाडांची लागवड केली होती. मात्र स्थानांतरण झाल्यानंतर अचानक त्या झाडांची कत्तल करून विक्री केल्याचे प्रकार उघडकीस आले. दरम्यान ग्रामपंचायतीने चौकशी केली तसेच स्थानांतरण झालेल्या आरोग्य सेविकेला विचारपूस केली असता, मी झाडांची लागवड केली होती, म्हणून मी कापून विक्री केली, अशी माहिती दिली. शासन एकीकडे वृक्षा लागवडीसाठी विशेष मोहिम राबविते. तसेच वृक्षांचे संवर्धन करून त्याचे जतन करण्यासाठी निधीची तरदूत करून नागरिकांमध्ये जनजागृती करते. विशेष म्हणजे शासकीय संंपत्तीतील वृक्षांची कत्तल किंवा इतर साहित्याची अफरातफर किंवा चोरी केल्यास कायदेशीर गुन्हा आहे. मात्र शासकीय कर्मचार्‍यानेच वृक्षांची कत्तल करून विक्री केल्याचे प्रकार उघड झाले. ही बाब बेरार टाईम्सने ४ मार्चला समोर आणली होती. याची दखल घेत तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या समितीने आज सेजगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र परिसरातील कत्तल झालेल्या वृक्षांची तपासणी केली. तसेच ग्रामपंचायतीला आपले म्हणणेही विचारले. येत्या काही दिवसात चौकशी अहवाल जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांना सादर करणार असल्याचीही माहिती ग्रामपंचायतीला दिली. तेव्हा हे कृत्य करणार्‍या कर्मचार्‍यावर कोणती कारवाई प्रस्तावित करण्यात येते, याकडे लक्ष लागले आहे.
………….
प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील वृक्ष प्रकरणाची आज समितीच्या वतीने चौकशी करण्यात आली. त्यांनी आपल्या स्तरावर चौकशी केली आहे. दरम्यान ग्रामपंचायतच्या वतीने येत्या एक-दोन दिवसात ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांची भूमिका घेवून ग्रामपंचायतीचा अहवाल चौकशी समितीकडे सादर करणार.
— सौ. उषा कठाणे, सरपंच -सेजगाव