महिलांच्या स्वकर्तृत्वामुळेचं विकासाला गती मिळाली -आमदार मनोहर चंद्रिकापुरे

0
18

पांढरवाणी (रै ) येथे अंगणवाडी लोकार्पण व बालक पालक महिला मेळावा उत्साहात

अर्जुनी /मोर ता.12:– समाजकारण, राजकारण आणि प्रशासन या प्रत्येक क्षेत्रात महिलां पुढे गेल्या आहेत.महिलांच्याचं स्वकर्तृत्वामुळे हे सिद्ध झाले असून देशाच्या प्रगतीला चालना मिळाली आहे ,असे प्रतिपादन अर्जुनी /मोरचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी (ता.11) केले.
तालुक्यातील पांढरवाणी रैयत येथे अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित बालक पालक आणि महिला मेळाव्यात ते उदघाटक म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंदिया जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंजि. यशवंत गणवीर हे होते. मंचावर अर्जुनी /मोर पंचायत समितीचे उपसभापती होमराज पुसतोडे, झाशीनगर गणाच्या पंचायत समिती सदस्य चंद्रकला ठवरे, सरपंच रंजना वाडगुरे, इंजि. नमुदेव नागपुरे,महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रियंका किरणापुरे आणि ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार चंद्रिकापुरे यांनी महिला सबलिकरणावर भर दिला.त्यांनी शासनाच्या विविध योजनांचा महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन केले.
यावेळी बोलताना श्री गणवीर यांनी महिलांच्या कार्याची जोरदार प्रशंसा केली,ते पुढे म्हणाले की, सामाजिक क्षेत्रातील एक म्हण प्रचलित आहे की “बाळाचे पाय पाळण्यात दिसतात!” परंतु आपल्या बाळात हा पायगुण निर्माण करण्याची युक्ती महिलांमध्येच आहे अशी ग्वाही त्यांनी दिली.या कार्यक्रमात छोट्या बालकांचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले असून युवतीनी नृत्य सादर केले.एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प आणि पवनी /धाबे बिटच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्या छायाचित्रांना माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. किरणापुरे यांनी, संचालन अंगणवाडी पर्यवेक्षिका वीणा वैद्य यांनी तर आभार अंगणवाडी सेविका रेवता गहाणे यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.