१२७ आदिवासी तरुण-तरुणी बांधणार रेशीमगाठ

0
17

गडचिरोली-गडचिरोली पोलिस दल पोलिस दादालोरा खिडकी आणि मैत्री परिवार संस्था नागपूर व गडचिरोली शाखेच्या संयुक्त विद्यमाने येत्या २६ मार्च रोजी चंद्रपूर मार्गावरील अभिनलच्या पटांगणावर सामूहिक विवाह सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले आहे. या विवाह सोहळय़ात आत्मसर्मपण केलेल्या ८ नक्षल्यांसह दुर्गम भागातील १२७ आदिवासी तरूण-तरुणींचा विवाह लावून देण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक निलोत्पल व मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष संजय भेंडे यांनी शुक्रवार, १७ मार्च रोजी घेतलेल्या पत्रपरिषदेत दिली.
पोलिस दादालोरा खिडी मागील अनेक वर्षापासून जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे. आदिवासी बांधवांची भयग्रस्त वातावरणातून मुक्तता करणे तसेच त्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केल्या जात आहे. सामुहिक विवाह सोहळा देखील त्याच श्रृंखलेतील एक उपक्रम आहे. मैत्री परिवारातर्फे २0१५ ला नागपूर येथील सामुहिक विवाह सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. दरम्यान, आत्मसर्मपित व आदिवासी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने २0१८ पासून गडचिरोली जिल्ह्यात हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
मैत्री परिवार संस्था दीड दशकापासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य आणि पर्यावरण क्षेत्रात कार्यरत आहे. मैत्री परिवाराने गडचिरोली जिल्हा दत्तक घेतला असून, पोलिस विभागाच्या मदतीने जिल्ह्यातील विविध भागात दीपावली सण साजरा करण्यासोबतच कपडे वाटप, वैद्यकीय शिबिरे, शैक्षणिक उपक्रम, रोजगार मेळावे राबविले जात आहेत. २0१८ साली पहिल्यांदा सामूहिक विवाह सोहळा घेण्यात आला. यापूर्वी नागपूर व अहेरी येथे प्रत्येकी एक गडचिरोली येथे दोन सामूहिक विवाह सोहळे पार पाडण्यात आले. आतापर्यंत १५ आत्मसर्मपित नक्षल जोडप्यांसह एकूण ४३३ आदिवासी युवक-युवतींचे विवाह पार पडले आहे.
येत्या २६ मार्च रोजी आयोजित विवाह सोहळ्याला गडचिरोली व नागपूर येथील अनेक मान्यवर, गडचिरोली पोलिस दलाचे अधिकारी आणि मैत्री परिवाराचे पदाधिकारी उपस्थित राहणार असून जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही या उद््घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक व मैत्री संस्थेच्या पदाधिकारी दिली.
यामध्ये सहभागी ८ नक्षल्यांची नावे सुरक्षितेच्या दृष्टीकोणातून उघड करण्यात आले नसून सर्व जोडप्यांना सोन्याचे एक डोरले व संसारोपयोगी साहित्य देण्यात आहे. दानशुर व्यक्तींनी प्रत्येकी एका जोडप्याचे पालकत्व स्वीकारून ३0 हजार रुपयांपर्यंतचा खर्च करू शकणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. यावर्षीचा विवाह सोहळा अधिक शानदार आणि भव्य व्हावा, यासाठी पोलिस विभाग व मैत्री परिवार संस्थेचे कार्यकर्ते सर्मपित भावनेने कार्य करीत आहेत. पत्रपरिषदेला पोलिस अधीक्षक निलोत्पल, मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष संजय भंडे, सचिव प्रमोद पेंडके यासह पदाधिकारी उपस्थित होते.