जागा वाटपावरून भाजप आणि शिंदे गटात जुंपली

0
47

48 जागा लढवायला आम्ही काय मूर्ख आहोत काय?;संजय शिरसाट संतापले

मुंबई :-भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीत 288 जागांपैकी 240 जागा लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या वाट्याला फक्त 48 जागा येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. बावनकुळे यांच्या या विधानामुळे शिंदे गटात एकच खळबळ उडाली आहे. तसेच राजकीय निरीक्षकांच्या भुवयाही उंचावल्या आहेत. बावनकुळे यांच्या या फॉर्म्युल्यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त केला आहे. 48 जागा लढवायला आम्ही मूर्ख आहोत काय? बावनकुळे यांना अधिकार कोणी दिला? त्यांनी आपल्या मर्यादेतच बोलावं, अशा शब्दात संजय शिरसाट यांनी बावनकुळे यांना सुनावले आहे.

भाजपाच्या प्रसिद्धी प्रमुखांची काल बैठक पार पडली. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी जागा वाटपाचा फॉर्म्युलाच सांगितला. भाजप आणि शिंदे गट एकत्र मिळून ही निवडणूक लढणार आहे. आपण 240 जागांवर लढणार आहोत. शिंदे गटाचे 50च्यावर आमदार नाहीत. 2024च्या विधानसभा निवडणुकीत आपल्या 170 जागा निवडून येतील. असे त्यांनी सांगितले.यासोबतच महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागा आहेत. अशात २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा २४० जागा लढवणार तर ४८ जागा या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दिल्या जाणार आहेत. २०२४ मध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपा एकत्र लढणार आहेत. त्यासाठीचा हा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे.

चंद्रशेखर बावनकुळेंच्या स्टेटमेंटमध्ये काही दम नाही. बावनकुळेंना भाजपने एवढे अधिकार दिलेले नाहीत. कोणी दिला अधिकार त्यांना? हे असे स्टेटमेंट दिल्याने युतीत बेबनाव येतो. याची जाणीव त्यांनी ठेवावी. 48 जागा लढवणारे आम्ही काय मूर्ख आहोत काय? याची वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल. त्या बैठकीत जो निर्णय होईल ते वरिष्ठ नेते जाहीर करतील. त्यांना जाहीर करू द्या. तुम्हाला मला अधिकार कोणी दिला? अशामुळे पक्षातील कार्यकर्त्यात चिलबिल सुरू होते, असा संताप संजय शिरसाट यांनी व्यक्त केला आहे.

बानकुळेंचा अतिउत्साह

बावनकुळेंचा अतिउत्साह आहे. अतिउत्साहाच्या भरात त्यांनी ते स्टेटमेंट केलं आहे. त्यांना वाटतं की मी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे, त्यामुळे माझ्या नेतृत्वात अधिका जागा याव्यात. त्यात काही वावगं नाही. पण अशा स्टेटमेंटमुळे इतर जे आपले सहकारी पक्ष आहेत. त्यांना त्याचा त्रास होतो. मित्र पक्ष दुखावले जातात. याचं भान बावनकुळे यांनी ठेवलं पाहिजे, असं सागंतानाच खरंच का भाजप एवढ्या जागा लढवणार? मग आमच्या वाट्याला काय येणार आहे, असे प्रश्न मित्र पक्षातील नेत्यांमध्ये निर्माण होतात. त्यामुळे आपल्या अधिकारात जे आहे, तेवढच त्यांनी बोलावं. जो काही मोठा निर्णय असतो. तो प्रदेशाध्यक्ष किंवा स्थानिक कमिटी घेत नाही. वरिष्ठ नेते निर्णय घेतात असंही त्यांनी सांगितलं.

वरिष्ठच निर्णय जाहीर करतील

जागा वाटपाचा जो काही निर्णय आहे. तो वरिष्ठ पातळीवर होईल. वरिष्ठ नेत्यांची बैठक होईल. त्यात जागा वाटपाचा निर्णय होईल. नंतर हा निर्णय जाहीर केला जाईल. वरिष्ठच ते जाहीर करतील. त्यामुळे थोडी सबुरी ठेवा. नको त्या प्रतिक्रिया देऊ नका, असं शिरसाट म्हणाले. शिरसाट यांनी अत्यंत आक्रमकपणे आपली प्रतिक्रिया देताना बावनकुळे यांच्या विधानावर तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. त्यामुळे आता त्यावर बावनकुळे काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.