कोका अभयारण्यातील T13 वाघाचा मृत्यू

0
37

भंडारा –जिल्ह्यातील नवेगांव- नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील कोका वन्यजीव अभयारण्यामध्ये खुर्शिपार तलावाच्या पाणलोट क्षेत्रातील नाल्यात आज दुपारी 1 वाजता दरम्यान T13 या पट्टेदार वाघाचा मृतदेह गळालेल्या अवस्थेत दिसून आला. तीन दिवसापासून हा मृतदेह पाण्यात असल्याचा अंदाज आहे. गस्तीवर असलेल्या वन कर्मचाऱ्यांना हा मृतदेह सापडला. नवेगांव- नागझिराच्या व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक जयराम गवडा, उपसंचालक पवन जेफ, साकोली वन परिक्षेत्राचे सहाय्यक वन संरक्षक रोशन राठोड ताबडतोब त्यांच्या चमुसह घटनास्थळी पोहोचले. पशू वैद्यकीय अधिकारी देशमुख आणि भडके यांनी शव विच्छेदन केले. मृत्यूचे कारण अद्याप कळू शकले नाही. वैद्यकीय चमू त्यांचा अहवाल उद्या पर्यंत देण्याची शक्यता आहे. मानद वन्यजीव सदस्य नदीम खान, शाहिद खान आणि पर्यावरण संरक्षण संस्थेचे अझहर हुसेन यांनी सांगितले की, या वाघाचे सर्व अवयव साबुत असल्याने वाघाच्या अवयवासाठी शिकारीची शक्यता नाही. यावेळी कोका वन्यजीव अभयारण्याचे रेंजर माकडे आणि नरड उपस्थित होते.