महामानवांच्या जयंतीदिनी प्रशासनाने दारू व मांसविक्रीवर कडक बंदी घालावी – सर्वसमाज संघटनेची मागणी

0
12

गोंदिया :- ज्या महामानवानी मानव कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष केला, समाजात शिक्षण, समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य, मानवी मूल्ये रुजविली, व्यसनमुक्तीचा संदेश दिला, भारतीय राज्यघटनेचे कलम ४७ मध्ये आरोग्यास घातक अशा मद्यपानावर बंदी घालण्याबाबत नमूद केले अशा महामानवांच्या जयंती दिनी दारू व मांस विक्रीवर बंदी घालण्याची मागणी करणारे निवेदन सर्व समाज संघटनांतर्फे मा.जिल्हाधिकारी व माननीय पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले.
या प्रसंगी निवेदन सादर करताना सर्वसमाज विचार महोत्सव समितीच्या अध्यक्षा प्रा.डॉ. दिशा गेडाम, समता सैनिक दलाच्या कमांडर किरण वासनिक, ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळचे वसंत गवळी, ओबीसी सेवा संघ, संघर्ष कृती समितीचे सि.पी.बिसेन, कैलास भेलावे, जेसीआय गोंदिया सेंट्रलचे पुरुषोत्तम मोदी, युवा बहुजन मंचचे सुनील भोंगाडे, रवी भांडारकर, युवा ग्रेज्युएट फोरमचे उमेश कटरे, स्वाती वालदे, आनंद राहुलकर, शैलेंद्र चौरे, संविधान मैत्री संघाचे कार्यकर्ते इत्यादींचा समावेश होता. उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी निवेदन स्वीकारले.
बाबासाहेब डॉ.भीमराव आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध आणि सम्राट अशोक महान, महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती संयुक्तपणे दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात साजरी करण्यात येते. या जयंती कार्यक्रम रैली दरम्यान काही समाजकंटक, उन्मत्त, गुंड प्रवृत्तीने प्रेरित मद्यधुंद होऊन डीजे च्या तालावर, अश्लील गाण्यांवर नाचतात. असले प्रकार मानवतावादी विचारसरणीचे विसंगत वर्तन आहे. जयंती उत्सवाच्या कार्यक्रमात अनुयायांची मोठी गर्दी असते. अंमली पदार्थ आणि दारूचे सेवन केल्याने भांडण तंटा होण्याची शक्यता असते. दारू बंदीमुळे पुरेशा प्रमाणात आळा बसेल आणि अशी प्रकरणे कमी होतील.
जनामनात महामानवांच्या जागतिक दर्जाच्या विद्वत्ता-विचारसरणीनुसार आचरण असावे या शुद्ध हेतुने शिक्षण क्रांतीचे प्रणेते महात्मा फुले जयंती 11 एप्रिल, विश्व ज्ञान प्रतीक संविधान निर्माता बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर जयंती 14 एप्रिल आणि शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध जयंती 5 में या दिनी गोंदिया जिल्ह्यात कोणत्याही प्रकारच्या पशुहत्या, मांस, मासे व मद्य विक्रीवर पूर्ण बंदी घालावी, तसेच सुष्क दिवस (ड्राई डे) काटेकोरपणे पाळण्यात यावा, चोख बंदोबस्त असावा, डीजे आणि अश्लील गाण्यांवर बंदी घालावी, ज्यांच्याकडे दारू विक्रीचा परवाना आहे अशी दारूची दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, क्लब आणि इतर विक्री केंद्रे/सर्व्हिस पॉइंट्स, नॉन- प्रोप्रायटरी क्लब, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स इत्यादींवर बंदी घालावी, ड्राई डे घोषित करून कोणालाही दारू विक्री आणि सर्व्ह करण्यास परवानगी देऊ नये या मागणी सह अमली पदार्थमुक्त, हिंसामुक्त वातावरण राखण्याचे आवाहन निवेदनात करण्यात आले आहे.