सामाजिक न्याय समता पर्वाचे उद्घाटन उत्साहात

0
18
वाशिम,दि.१- डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, वाशिम येथे सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,जिल्हा समाज कल्याण अधिकारी,जि.प. आणि जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांचे संयुक्त वतीने आज १ एप्रिल रोजी सामाजिक न्याय समता पर्वाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
       उद्घाटन जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणचे सचिव न्या.विजय टेकवाणी यांनी केले.अध्यक्षस्थानी श्री.सरस्वती समाजकार्य महाविद्यालय वाशिमचे प्राचार्य प्रा.यु.एस.जमदाडे होते.यावेळी समाजकल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ,रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय वाशिमचे प्राचार्य श्री बारड व समाज कल्याण निरिक्षक राहुल शिरभाते यांची प्रमुख उपस्थिती होती.
     मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम दीप प्रज्वलन करुन महापुरुषांच्या प्रतिमेला हार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.प्रास्ताविकातून श्री. वाठ यांनी १ मे पर्यंत सामाजिक न्याय समता पर्व राबविण्यात येत असल्याचे सांगितले.यावेळी समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली.ह्या योजना ग्रामीण भागात तळागाळापर्यंत पोहचविण्याचा समता पर्वाचा उद्देश असल्याचे सांगितले.
          जिल्हा समाज कल्याण कार्यालयाच्या अधीक्षक कल्पना ईश्वरकर यांनी समता पर्वानिमीत्त आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमाची माहिती दिली.
             उदघाटक म्हणून बोलताना श्री.टेकवाणी म्हणाले,समाज कल्याण विभाग हा मला माझाच विभाग वाटतो.समाज कल्याण विभागाचे काम जसे विविध योजनांचा लाभ देऊन सेवा देण्याचे आहे तसेच माझ्या पण विभागाचे काम सेवा देण्याचेच आहे.आमच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामध्ये विविध योजना राबविल्या जातात. याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने मनोधैर्य योजनेतून ७० लाख रुपये लाभार्थ्यांना वाटप केल्या त्यांनी यावेळी सांगितले.
        प्रा. बारड यांनी अनु.जाती व नवबौद्ध घटकांसाठी ज्या महापुरुषांनी काम केले आहे त्यांच्याच कामासाठी हा समाज कल्याण विभाग निर्माण झाला आहे.अनु.जाती व नवबौद्ध घटक व वंचित माणसांपर्यंत समाज कल्याणाच्या माध्यमातून विकास होत आहे असे सांगितले.
      श्री. शिरभाते यांनी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती दिली.
               प्रा.श्री.जमदाडे यांनी सामाजिक न्याय विभागाच्या योजनाचा या सर्व समाजाच्या तळागाळापर्यंत या एका महिन्याच्या कालावधीमध्ये प्रचार आणि प्रसार करावयाचा आहे. सामाजिक न्याय विभाग हा समाजाच्या सर्व वंचित घटकाच्या पाठीमागे उभा आहे. सामाजिक बदल आज खूप मोठया प्रमाणावर झालेला आहे. त्यानुसार आपल्याला बदलावे लागेल असे सांगितले.
              कार्यक्रमाचे संचालन रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा.श्री. हिवसे यांनी केले. आभार श्रीमती ईश्वरकर यांनी मानले.
               कार्यक्रमाला सामाजिक न्याय विभागातील अधिकारी व कर्मचारी,शासकीय वसतीगृहातील गृहपाल व विद्यार्थी,शासकीय निवासी शाळेतील मुख्याध्यापक ,समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग व ब्रिक्स प्रा. लि. व क्रीस्टल कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.