अनधिकृत व विनापरवाना बियाणे, खते व किटकनाशके  विक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार – हिंदुराव चव्हाण

0
8

. जिल्ह्यात मुबलक प्रमाणात रासायनिक खते उपलब्ध

     गोंदिया, दि.18 :- जिल्हयामध्ये बियाणे, खते व किटकनाशके यांचा काळाबाजार होण्यास प्रतिबंध कण्यासाठी व गुणवत्तापूर्ण बियाणे, खते व किटकनाशके शेतकऱ्यांना उपलब्ध होण्यासाठी जिल्हास्तरावर एक व प्रत्येक तालुका स्तरावर एक याप्रमाणे एकूण नऊ भरारी पथकांची स्थापना केली आहे. बियाणे व खतांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही. यासाठी जिल्हयात कोणीही अनधिकृत अथवा विनापरवाना असलेले बियाणे, खते व किटकनाशके विक्रीस आणु नये अन्यथा संबंधितांच्या विरूध्द फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येतील, असा इशारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण यांनी  दिला आहे.

         जिल्हयात खरीप हंगाम २०२३-२४ साठी मुबलक प्रमाणात रासायनिक खते उपलब्ध होण्यासाठी कृषि विभागाने नियोजन केले आहे. पीक संरचनेतील बदल व खत वापराच्या शिफारसी प्रमाणे जिल्हयासाठी एकूण १ लक्ष २१ हजार ५३ मेट्रीक टन रासायनिक खतांची मागणी करण्यात आली असून ६९ हजार ३३० मेट्रीक टन खते व २७ हजार ९० बॉटल्स नॅनो युरीयाचे आवंटन शासनाकडून प्राप्त झाले आहे. रब्बी हंगामातील सुमारे ३४ हजार ५१० मेट्रीक टन खत साठा जिल्हयामध्ये शिल्लक आहे.

         जिल्हयास आगामी खरीप हंगामात बियाणे मुबलक प्रमाणात शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे यासाठी कृषि विभागाने २ लक्ष ४ हजार ३५८ हेक्टरवर नियोजन केले आहे. यामध्ये जिल्हयातील प्रमुख पीक असलेल्या भात बियाणांच्या १ लाख ९२ हजार ६२५ हेक्टर लावगडीचे नियोजन आहे. त्यासाठी ४९ हजार ६७० क्विंटल बियाणे महाबीज व खाजगी कंपन्याकडून उपलब्ध होणार आहे.

        जिल्हयामध्ये बियाणे, खते व किटकनाशके यांचा काळाबाजार होण्यास प्रतिबंध करण्यासाठी व गुणवत्तापूर्ण बियाणे, खते व किटकनाशके शेतकऱ्यांना उपलब्ध होण्यासाठी जिल्हास्तरावर एक व प्रत्येक तालुका स्तरावर एक याप्रमाणे एकूण नऊ भरारी पथकांची स्थापना केली आहे. बियाणे व खतांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही. यासाठी जिल्हयात कोणीही अनधिकृत अथवा विनापरवाना असलेले बियाणे, खते व किटकनाशके विक्रीस आणु नये अन्यथा संबंधितांच्या विरूध्द फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येतील. शेतकरी बंधूनी अधिकृत व परवानाधारक विक्रेत्यांकडूनच बियाणे, खते व किटकनाशके खरेदी करावे व त्याचे पक्के बिल विक्रेताकडून घ्यावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी हिंदूराव चव्हाण यांनी केले आहे.