जागतिक जैवविविधता दिवस उत्साहात साजरा

0
11

वाशिम, दि. 22  : पर्यावरण पूरक जीवन पद्धती अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन प्रकल्प संचालक आत्मा व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण वाशिम यांच्या संयुक्त वतीने आज आत्मा कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आले.

          अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव विजयकुमार टेकवाणी होते. प्रमुख मार्गदर्शक ॲड. परमेश्वर शेळके, मुख्य लोक अभिरक्षक विधी सेवा प्राधिकरण, कृषी संशोधन प्रकल्प वाशिमचे भरत गीते, वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ तथा प्रमुख कृषी विज्ञान केंद्र करडा डॉ रवींद्र काळे, आत्माचे संतोष वाळके, सहायक लोक अभिरक्षक ॲड. अतुल पंचवटकर व सहाय्यक लोक अभीरक्षक हेमंत इंगोले यांची प्रमुख उपस्थिती होती.

           प्रास्ताविक आत्माचे प्रकल्प उपसंचालक संतोष वाळके यांनी केले. त्यांनी या कार्यक्रमात आयोजन व सप्ताहामध्ये होणाऱ्या विविध कार्यक्रमाची माहिती दिली.

          अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन करताना न्या. टेकवाणी म्हणाले,  पृथ्वीवर सजीवांची जीवन श्रुंखला अबाधित ठेवूनच मानवाला जीवन जगता येईल. त्यामुळे मानवाने इतर प्राण्यांप्रमाणेच सृष्टीचे जतन करून जीवन जगायला हवे. असे सांगून त्यांनी विधी सेवा प्राधिकरण या स्वतंत्र विभागाची निर्मिती गरजूंना न्याय मिळावा याकरीता सहाय्य करण्यासाठी झाली आहे. या विभागामार्फत विविध गरीब कुटुंबातील व्यक्तींना न्यायालयात खटले चालविण्याकरीता मदत केली जाते. त्याचा फायदा जनतेने घ्यावा. असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

          ॲड. शेळके यांनी त्यांच्या विभागामार्फत  न्यायीक योजनांची माहिती दिली. तसेच सप्ताहामध्ये हवामान अनुकूल तंत्रज्ञानाविषयी कृषी विद्यापीठाचे भरत गीते यांनी माहिती दिली. कृषी विज्ञान केंद्र, करडाचे डॉ. रवींद्र काळे यांनी मार्गदर्शन केले. तसेच सहाय्यक लोक अभीरक्षक ॲड. पंचवटकर, ॲड. इंगोले यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, कृषी सहाय्यक तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांचे शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. संचालन जयप्रकाश लव्हाळे यांनी केले. पर्यावरण पूरक जीवन पद्धती अभियानांतर्गत दिनांक 22 ते 28 मे 2023 या कालावधीत संपूर्ण सप्ताह कार्यक्रम राबविण्यात येत आहे.