भंडारा -: ऑलम्पिक पदक विजेत्या महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक अत्याचाराचे आरोपी भाजपचे खासदार, भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांना त्वरित अटक करा या व इतर मागण्यांसाठी भारतीय महिला फेडरेशन व भाकपच्या वतीने दिनांक 23 मे रोजी दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय समोर निदर्शने करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिल्हाधिकाऱ्यामार्फत निवेदन देण्यात आले.
आंदोलनाचे नेतृत्व भारतीय महिला फेडरेशनच्या अध्यक्ष काॅ.सिमा फुले व भाकप चे जिल्हा सचिव व दलित अधिकार आंदोलनाचे राज्य सहसचिव काॅ.हिवराज उके यांनी केले.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दोन एफ आय आर दाखल होऊनही आणि पोक्सो कायद्यात तक्रारीनंतर आधी अटक करावी व नंतर तपास सुरू करावे अशी तरतूद असूनही भाजपचे आरोपी खासदार ब्रिज भूषण सिंग यांना अटक होत नसल्याने आरएसएस भाजप प्रणित मोदी-शहा सरकार विरुद्ध सर्वत्र निषेध व संताप व्यक्त करण्यात येत आहे.
याच अनुसंघाने भारतीय महिला फेडरेशनच्या देशव्यापी आवाहनानुसार भंडारा येथे भारतीय महिला फेडरेशन व भाकपच्या वतीने निदर्शने आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला व खालील तीन मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात भाजप खासदार ब्रिजभूषण शरन सिंह यांना त्वरित अटक करा आणि त्यांचे संसदेतून निलंबन करा. त्यांच्याविरुद्धच्या तक्रारींची न्यायालयीन चौकशी करा आणि कालबद्ध ,सुयोग्य, निष्पक्ष तपास करून त्यानंतर आरोपपत्र ठेवून आणि फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवा.) कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळ विरोधी कायदा ( POSH )आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा ( POCSO )पोक्सो या दोन्ही कायद्यांची योग्य आणि प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी तातडीने आवश्यक ती सर्व पावले उचला आणि सक्षम व प्रभावी यंत्रणा तयार करा. या मागण्यांचा समावेश आहे.
आंदोलनात भारतीय महिला फेडरेशनच्या अध्यक्षा सीमा फुले, प्रियकला मेश्राम, रत्नाबाई इलमे व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड हिवराज उके, ओबीसी जनगणना परिषदेचे कॉम्रेड सदानंद इलमे, कॉम्रेड गजानन पाचे तसेच महानंदा गजभिये, भगवान मेश्राम, उर्मिला वासनिक, ललिता तिजारे, ज्योती गडकरी, दमनबाई गणवीर, वामनराव चांदेवार इत्यादींची उपस्थिती होती.