‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांच्या घरी जाऊन दिला विविध शासकीय योजनेचा लाभ

0
10
????????????????????????????????????

भंडारा, दि. 23 मे : शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ अभियान शासनाच्या वतीने राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आज जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी भंडारा तालुक्यातील इंजेवाडा येथे लाभार्थ्यांच्या घरी जाऊन महसूल विभागामार्फत लाभार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला, वन विभागामार्फत वन्य प्राण्यांमुळे नुकसान झालेल्या भरपाईचा मोबदला, पुरवठा विभागामार्फत राशनकार्ड, भूमी अभिलेख विभागामार्फत जागेची सनद, एम. आर. इ. जी. एस. अंतर्गत लाभार्थ्यांना जॉबकार्ड यावेळी वाटप करण्यात आले.

उपजिल्हाधिकारी अर्चना यादव, उपविभागीय अधिकारी रविंद्र राठोड, तहसीलदार अरविंद हिंगे, गटविकास अधिकारी संघमित्रा कोल्हे, उपअधिक्षक भूमी अभिलेख गौरीशंकर खिची, इंजेवाडा सरपंच किशोर मसराम, नायब तहसीलदार राजेंद्र निंबार्ते यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

नागरिकांना शासकीय कार्यालयामध्ये येणे, योजनांची माहिती घेणे, योजनेसाठी आवश्यक असलेले दस्तऐवज विविध कार्यालयात जाऊन जमा करणे, जमा केलेले कागदपत्र पुन्हा सादर करण्यासाठी कार्यालयाकडे येणे अशा विविध प्रक्रियेतून जावे लागते. शासनाची नागरिकांना दस्तऐवज उपलब्ध करून देणारी ही कार्यालये वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयात जावे लागते. तसेच सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यास त्या दूर करण्यासाठी वारंवार त्या कार्यालयामध्ये जावे लागते. काही वेळा अनेक लोकांना त्यांना शासनाकडून देय असलेल्या योजनांची माहिती नसते आणि माहितीअभावी या योजनांचा लाभ गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे या योजनांचा उद्देश पूर्णपणे सफल होत नाही. यासाठी शासनाने ‘शासन आपल्या दारी’ अभियान सुरु करण्यात आले आहे.

‘शासन आपल्या दारी’ या अभियानाचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.