स्त्री शक्ती समाधान शिबिराचे जिल्हाभर आयोजन २४ ते ३० मे दरम्यान आयोजन

0
11

गोंदिया, दि. 23 : शासन आपल्या दारी  या अभियानांतर्गत शासनाच्या विविध विभागांमार्फत राबविण्यात येत असलेल्या महिलांविषयक व विविध योजनांची माहिती उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने तसेच महिलांच्या स्थानिक विविध शासकीय विभागांशी संबंधीत समस्या व तक्रारींचे निराकरण करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीराचे आयोजन 24 मे 2023 पासून प्रत्येक तालुक्यात करण्यात आले आहे. या शिबिराची सुरुवात गोंदिया येथून करण्यात येणार आहे. पहिले शिबीर पंचायत समिती, गोंदियाचे सभागृहात 24 मे रोजी सकाळी 09 आयोजित करण्यात आले आहे.

          25 मे आयटीआय सभागृह आमगाव, 26 मे पंचायत समिती सभागृह तिरोडा, 26 मे तेजस्विनी लॉन शेंडा रोड सडक अर्जुनी, 29 मे गुरुकृपा लॉन ठाणा रोड गोरेगाव, 29 मे तहसील कार्यालय सभागृह देवरी, 30 मे शिवप्रसाद सदानंद वरिष्ठ महाविद्यालयाचे नवीन सभागृह अर्जुनी मोरगाव, 30 मे तहसील कार्यालय सभागृह सालेकसा या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा या दृष्टीने महिलांच्या अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यांसाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिनाच्या धर्तीवर तालुका स्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे.

 सदर शिबीरात तालुकास्तरावरील सर्व शासकीय विभागांच्या योजनांची माहिती तालुकास्तरावरील विभाग प्रमुखांकडून देण्यात येणार आहे. तसेच महिलांच्या विविध विभागांकडील समस्या व तक्रारींचे निराकरण करण्यात येणार आहे. सदर शिबीरात गोंदिया जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील जास्तीत-जास्त गरजू महिलांनी उपस्थीत राहावे व शिबीराचे लाभ घेऊन शिबीर यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बालकल्याण विकास अधिकारी यांनी केले आहे.