नक्षल्यांच्या कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी केकेएम ट्रायजंक्शन

0
21
वाढदिवसाच्या शुभेच्छा

केकेएम ट्रायजंक्शन अंतर्गत तिन्ही राज्याचे पोलीस एकाच छताखाली

गोंदिया(खेमेंद्र कटरे)- महाराष्ट्र,छत्तीसगड व मध्यप्रदेशच्या सीमेलगत असलेल्या भागात नक्षल्यांचा वावर मोठ्याप्रमाणात असल्याने आणि गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी नक्षलग्रस्त असलेल्या भागाला रेस्टझोन  निवडल्याने भविष्यातील हालचालीवंर नजर ठेवत नक्षल्यांचे समुळ उच्चाठनाच्या उद्देशाने केकेएम ट्रायजेंक्शन अंतर्गत मुरकुटडोह येथे सशस्त्र पोलीस दुरक्षेत्र उभारण्यात आले आहे.गडचिरोली पोलिसांनी जेव्हा अबुझामगड येथील नक्षल्यांचे बेसकॅम्प उध्वस्त केले,त्यानंतर नक्षल्यांनी मुरकुटडोह,कट्टेपार व कटेंमा या भागात आपला बेसकॅम्प बसविण्याची योजना आखली होती.त्यामुळे पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने त्यांच्या आधीच याठिकाणी महाराष्ट्र,छत्तीसगड व मध्यप्रदेशातील पोलीस प्रशासनाने एकत्र येत सयुंक्त कारवाईच्या दृष्टीने हे मुरकुटडोह येथे सयुंक्त सशस्त्र पोलीस चौकी उभारली आहे.गोंदिया जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या मुरकुटडोह या अत्यंत नक्षलग्रस्त भागात 20 मे रोजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पार पडले.

जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील मुरकुटडोह क्र. 1, 2, 3 आणि दंडारी हे नक्षलवादी कारवायांमुळे अति संवेदनशील क्षेत्र आहेत. ही सर्व गावे दरेरकसा ग्रामपंचायत अंतर्गत येतात. यापैकी छत्तीसगड राज्याची सीमा मुरकुटडोहपासून अवघ्या 4-5 किमी अंतरावर आहे. यापैकी, छत्तीसगड राज्यातील पुर्वीच्या राजनांदगाव व आत्ताच्या खैरागड जिल्ह्यातील कट्टेमा गाव मुरकुटडोहसह 1 किमीची सीमा सामायिक करते, तर मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील कट्टेपार(सितेपाला पोलीसचौकी अंतर्गत) गाव केवळ 3.5 किमी अंतरावर जिल्ह्याच्या सीमेला लागून आहे.यागावाजवळून वाहणार्या नाल्याच्या इकडे महाराष्ट्र तर पलीकडे मध्यप्रदेश व छत्तीसगड असा परिसर पहाडाने व्यापलेला आहे.हा डोंगराळ व जंगल परिसर नक्षलवाद्यांच्या कारवायांचा परिसर आहे. या भागात यापूर्वीही अनेक नक्षलवादी घटना समोर आल्या आहेत. सध्या नक्षलवादी घटनांमध्ये घट झाली आहे. मात्र या नक्षलवादी घटना आणि कारवाया रोखण्यासाठी मुरकुटडोह येथे बेस कॅम्प उभारणे गरजेचे होते.त्यासाठी तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध जायस्वाल यांनी पुढाकार घेत मध्यप्रदेश व छत्तीसगडच्या पोलीस महासंचालकांशी सवांद साधत सयुंक्त कारवाईकरीता एकत्र तीन्ही ठिकाणचे पोलीस सोबत असणे आवश्यक असल्याचे पटवून दिले होते.त्यानंतर याठिकाणी या सशस्त्र पोलीस चौकीच्या बांधकामाला सुरवात झाली.

सयुंक्त कारवाई आणि नक्षल्यांवर वचक ठेवण्यासाठी हे ट्रायजंक्शन-पोलीस अधिक्षक निखील पिंगळे                     गोंदिया जिल्ह्यात सध्याच्या घडीला नक्षल कारवाया नसल्या तरी अधूनमधून नक्षली आपले वर्चस्व याठिकाणी गाजविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसून येतात.त्यातच गोंदिया जिल्ह्याची सीमा ही छत्तीसगडच्या राजनांदगाव ,खैरागढ व मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्याला लागून आहे.बालाघाट व मंडला जिल्ह्यातील कान्हा राष्ट्रिय व्याघ्रप्रकल्पातील घनदाटजंगल आणि सिमावर्ती भागातील जंगलाचा फायदा घेत नक्षल्यानी या मार्गाने कान्हा ते अमरकंटक पर्यंत आपली मुव्हमेंट कायम ठेवली आहे.यातच मुरकुटडोह हा भाग मध्यभागी येत असल्याने याठिकाणी आपले स्थान निश्चित करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने याठिकाणी 1.57 हेक्टर जागेवर या आमर्ड आऊटपोस्टचे बांधकाम 2019 पासून सुरु करण्यात आले आणि 2022 मध्ये पुर्ण करण्यात आले.या आऊट पोस्टच्या माध्यमातून नक्षलवादी कारवाया रोखण्यासाठी तिन्ही राज्यांचे पोलीस संयुक्त मोहिमेअंतर्गत कार्यरत आहेत. छत्तीसगड राज्यातील कट्टेमा, मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील कट्टेपार आणि मुरकुटडोह या अतिसंवेदनशील क्षेत्रासह KKM टीम अंतर्गत काम केले जात असल्याची माहिती पोलीस अधिक्षक निखील पिंगळे यांनी दिली.

कट्टेमा येथेहीन एओपीचे काम सुरू

छत्तीसगड राज्यातील कट्टेमा याठिकाणी सुध्दा छत्तीसगड प्रशासनाने पोलीस आऊटपोस्टचे काम हाती घेतले आहे.त्यामुळे भविष्यात नक्षल कारवायावंर अधिक लक्ष ठेवण्यास मदत होणार आहे.

केकेएम ट्रायजंक्शनमुळे नक्षल कारवायांना आळा-पोलीस उपमहानिरिक्षक संदिप पाटील                                     केकेएम(कट्टेपार,कट्टेमा व मुरकुटडोह)ट्रायजंक्शनमुळे नक्षल गतीविधीवर नजर ठेवण्यास मदत होत असून एखाद्या घटनेच्यावेळी कारवाई करतांना वरील आदेशाची वाट बघण्याचा किंवा त्या राज्यातील सिमेत कसा प्रवेश करायचा हा प्रश्न निकाली निघाला आहे.केकेएममध्ये महाराष्ट्र,छत्तीसगड व मध्यप्रदेश पोलिसांच्या तीन तुकड्या सोबत काम करीत असतात.छत्तीसगडच्या भागात कारवाई झाल्यास त्याभागात महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या पोलिसांना कारवाईसाठी जातांना विचार करावा लागायचा,मात्र आत्ता छत्तीसगडचेही जवान सोबतच राहत असल्याने त्याठिकाणी त्यांच्या नेतृत्वात तर मध्यप्रदेशातील भागात मध्यप्रदेश पोलिसांच्या नेतृत्वात एकत्र कारवाई करण्यास मदत झाल्याने भविष्यात या केकेएम ट्रायजंक्शनमुळे नक्षल्यांच्या वावर याभागातून कमी झाल्याचे दिसेल असे सांगितले.