… अन् कॅन्सरपीडित बालकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले!

0
14

‘देवता लाईफ फाऊंडेशन’च्या बच्चे कंपनीसोबत आर्या-आस्था भगिनींचा वाढदिवस

नागपूर : सर्वसामान्यपणे विपरित परिस्थिती आली की आपण दोन हात दूर राहण्याचा प्रयत्न करतो. मात्र आपदा, अपघात, आजार अशा स्थितीत आपण खंबीरपणे उभे राहिलो तर संकटांचा सामना सहजपणे करता येते. कॅन्सरसुद्धा त्यापैकीच एक… परंतु दुर्दम्य इच्छाशक्ती आणि सकारात्मकता यामुळे त्यावरही सहज मात करता येते. यासाठी समाजाचे, चारचौघांचे पाठबळ आणि हिम्मत आवश्यक असते. हीच हिम्मत आणि लढण्याची शक्ती निर्माण करण्याचे कार्य ‘देवता लाईफ फाऊंडेशन’तर्फे केले जात आहे. या फाऊंडेशनने दत्तक घेतलेल्या बालकांसोबत आर्या आणि आस्था अहेरराव या दोन भगिनींनी बुधवारी वाढदिवस साजरा करून कॅन्सरपीडित बालकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले.

यानिमित्त आयोजित छोटेखानी कार्यक्रमाला देवता लाईफ फाऊंडेशनचे अध्यक्ष किशोर बावणे, दि धरमपेठ महिला मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या अध्यक्ष निलीमा बावणे, व्यवस्थापकीय सल्लागार प्रताप हिराणी, कस्तुरी बावणे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते केक कापण्यात आला. याप्रसंगी आर्या – आस्थाची आई सरिता व वडील उमेश अहेरराव यांनी ‘देवता लाईफ फाऊंडेशन’ला धनादेश दिला. यानंतर बालकांसाठी विविध गेम्सचे आयोजन करण्यात आले होते. त्यात बच्चे कंपनी रममाण झाली. बच्चे कंपनीला यावेळी भेटवस्तूही देण्यात आल्या. संचालन मृणेशा पिल्लेवान यांनी केले. आयाेजनासाठी रश्मी शाहू यांनी सहकार्य केले. अभियांत्रिकी नुकतेच झालेल्या आर्या आणि आस्था या भगिनींनी वाढदिवस कॅन्सरग्रस्तांसाेबत साजरा करण्याच्या मनाेदयाबद्दल काैतुक केले.

‘देवता लाईफ फाऊंडेशन’ ही कॅन्सरग्रस्त बालकांसाठी काम करणारी संस्था आहे. आतापर्यंत या संस्थेने शेकडो बालकांना दत्तक घेत कॅन्सरशी लढण्यासाठी त्यांना पाठबळ दिले, आर्थिक मदत दिली. आताही अव्याहतपणे हे कार्य सुरू आहे. सोबतच दरम्यानच्या काळात अख्ख्या महाराष्ट्रभर ‘रक्तदान महायज्ञ’ राबविण्यात आला. त्याअंतर्गत महाराष्ट्रातील ५६०० किमी पिंजून काढत ठिकठिकाणी राबविण्यात आलेल्या रक्तदान शिबिरातून ७९०० युनिट रक्त संकलन करण्यात आले होते. सोबतच सायकल वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप, विविध समाजोपयोगी उपक्रम ‘देवता’च्या माध्यमातून राबविण्यात आले.

तुम्हीसुद्धा पुढे या!
छोट्या – छोट्या बालकांनाही कॅन्सरने घेरले आहे. खेळण्या-बागडण्याच्या वयातील या बालकांकडे पाहून मन हळवे होते. या बालकांसाठी छोटीसी मदत म्हणून आमची संस्था कार्य करते आहे. आपण वाढदिवस इतरत्र करता. मात्र या बालकांच्या मनात सकारात्मकता पेरण्यासाठी आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलण्यासाठी व त्यांना या लढाईत विजयी करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी या बालकांशी एकरुप होणे आवश्यक आहे. या बालकांसोबत त्यांनी वाढदिवस साजरा करावा.
– किशोर बावणे,
अध्यक्ष, देवता लाईफ फाऊंडेशन, नागपूर