पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती

0
16

अर्जुनी मोरगाव,दि.01- तालुक्यातील ग्रामपंचायत गोठणगाव, आदिवासी विविध सहकारी संस्था गोठणगाव, गजानन पाणी वापर संस्था बोंडगाव व ग्रामपंचायत बोंडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली.त्यानिमित्ताने सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ५८१ वी रैंक मिळवून गोंदिया जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या सुरबन/बोंडगावचे सुपुत्र अमित चंद्रभान उंदिरवाडे यांचा संयुक्त सत्कार करण्यात आला.त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनियुक्त सभापती यशवंत परशुरामकर, नवनियुक्त संचालक तथा राकापा तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे, मुंबई पोलीस दलात नियुक्त झालेली स्वाती टेंभुर्णे, समाजसेविका शकुंतला मिलिंद वालदे, महिला सक्षमीकरण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहणाऱ्या रेखा चौबे या सर्व सत्कारमूर्तींचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंजि यशवंत गणविर यांनी, सर्वप्रथम सर्व सत्कारमूर्तींना शुभेच्छा दिल्या.केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करुन अमितने गोंदिया जिल्ह्याचेच नाही तर आपल्या गावाचे व आपल्या क्षेत्राचे नावलौकिक केले.आपण जिथे वावरलो ज्यांच्या मार्गदर्शनाखाली यश संपादन करतो काही काळानंतर आपल्यात बदल घडवून आणतो आणि सर्व विसरुन एका प्रवाहाने वाटचाल सुरू करतो असे न करता आपल्या कडुन आपल्या परिसरातील सुशिक्षित वर्ग प्रेरीत झाला पाहिजे त्यांच्यातही जिद्द चिकाटी निर्माण झाली पाहिजे अशी उल्लेखनीय कामगिरी करावी.
पुढे बोलताना, कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनियुक्त सभापती यशवंत परशुरामकर हे सुद्धा एक शेतकरी पुत्र आहेत.तालुक्यातील शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन व सहकार्य करतील,जिथे माझी गरज पडेल तिथे मी येणार आणि जिथे यांची गरज भासेल तिथे यांनी सहकार्य करावे कारण आम्हाला “एकमेंका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ” या उक्तीप्रमाणे काम करायचे आहे. आज इथे ज्यांचा सत्कार झाला त्यांच्या कडुन प्रेरणा घेऊन आपणही सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्यावी.असे प्रतिपादन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पं.स.सदस्या आम्रपाली डोंगरवार, सरपंच संजय ईश्वार, उपसरपंच कांतीलाल डोंगरवार, बोंडगावच्या सरपंचा पुष्पाताई डोंगरवार, उपसरपंच दिलीप तिरपुडे,माजी जि.प.सदस्य रतिराम राणे, गिरीश पालीवाल,माजी पं.स.सदस्य दिनदयाल डोंगरवार, ग्रामपंचायत सदस्य रतिराम कोडापे, सुनंदा काटेंगे, भुमिका कराडे,मनोज रामटेके, कविता परतेकी, दिपक राणे,आदिवासी विविध सहकारी संस्था अध्यक्ष रवींद्र घरतकर, उपाध्यक्ष रघुनाथ मेश्राम, संचालक नारायण हटवार तथा परीसरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक राणे यांनी तर प्रास्ताविक माजी जि.प.सदस्य रतिराम राणे यांनी तर आभारप्रदर्शन ग्रामसेवक नोकेश धोटे यांनी केले.