ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रमाची आवश्यकता -षण्मुगराजन एस.

0
10

छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करीअर शिबीर

      वाशिम, दि. 01 : आज विविध क्षेत्रात करीअर करण्याच्या संधी उपलब्ध आहे. शिक्षण घेत असतांनाच आपल्याला कोणत्या क्षेत्रात करीअर करायचे आहे हे आधी निश्चित करावे. आपण निश्चित केलेले ध्येय गाठण्यासाठी युवा वर्गाने कठोर परिश्रम करण्याची आवश्यकता आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले.

वाशिम येथील राजस्थान आर्य महाविद्यालयात आज कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्या संयुक्त वतीने आयोजित छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करीअर शिबीरात अध्यक्ष म्हणून श्री. षण्मुगराजन बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, युपीएससी यश मिळविणारे अनुराग घुगे, जिल्हा कौशल्य, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संजय खंबायत, वाशिमच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य पी.एन. जयस्वाल यांची तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून गायकवाड क्लासेस वाशिमचे संचालक गणेश गायकवाड यांची उपस्थिती होती.

श्री. षण्मुगराजन पुढे म्हणाले, युवा वर्गाने माणूसकी जपून इतरांना मदत केली पाहिजे. आपण समाजाचा एक जबाबदार घटक आहोत या भावनेतून काम केले पाहिजे. जो गरजू आहे त्याला सहकार्य करण्याची भावना जपली पाहिजे. असे त्यांनी सांगितले.

श्रीमती पंत म्हणाल्या, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. त्यामुळे निराश न होता पुन्हा नव्या चैतन्याने आपले निश्चित केलेले ध्येय गाठण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी. मुलींनी तर स्वबळावर वेगवेगळया क्षेत्रात करीअर करुन आपले नाव कमवावे. जिद्दीतून आणि कठोर परिश्रमातून आपली वेगळी ओळख निर्माण करावी. असे त्या म्हणाल्या.

श्री. अनुराग घुगे म्हणाले, मला काय व्हायचे आहे, कोणत्या क्षेत्रात करीअर करायचे आहे हे मी आधीच निश्चित केले होते. माझे ध्येय गाठण्यासाठी विचलीत न होता अभ्यासावर पुर्ण लक्ष केंद्रीत करुन कठोर परिश्रम घेतले. याच परिश्रमाचे फळ मला नुकत्याच लागलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निकालात मी उत्तीर्ण होवून यश संपादन केल्याचे सांगितले.

श्रीमती बजाज म्हणाल्या, विविध क्षेत्र करीअर करण्यासाठी आज उपलब्ध आहे. कोणत्या क्षेत्रात आपल्याला करीअर करायचे आहे, हे आधी आपल्याला निश्चित करावे लागेल असे सांगून त्यांनी कमी कालावधीचे कोणते कोर्सेस आहे तसेच बाजारपेठेचे विश्लेषण करुन आपल्याला करीअरची निवड करता येईल. तसेच त्यांनी कौशल्य, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांची माहिती दिली.

श्री. खंबायत यांनी, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम यासह जिल्हा उद्योग केंद्राकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. गणेश गायकवाड यांनी देखील उपस्थित विद्यार्थ्यांना समायोचित मार्गदर्शन केले.

या युवाशक्ती करीअर शिबीराला जिल्हयातील विविध महाविद्यालयातील तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती. सभागृहाच्या बाहेर कौशल्य, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तंत्रनिकेतन वाशिम आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे स्टॉल लावण्यात आले होते. युवाशक्ती करीअर शिबीराच्या निमित्ताने इयत्ता 10 वी, 12 वी व पदवीच्या अभ्यासक्रमानंतर करीअरच्या संधी कोणकोणत्या क्षेत्रात आहे याची माहिती देणारे सचित्र प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला शिबीरात उपस्थित विद्यार्थ्यांनी भेट देवून माहिती जाणून घेतली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य पी.एन. जयस्वाल यांनी केले. संचालन दीपक भोळसे यांनी करुन उपस्थितांचे आभार उपप्राचार्य भाऊ गुल्हाने यांनी मानले.