एकलव्य मॉडेल स्कूल बोरगाव बा. येथील कर्मचारी आजपासून बेमुदत उपोषणावर

0
10

देवरी , दि.०६:- महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी, नाशिक तथा आयुक्त, आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य संचालित एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल बोरगाव/बाजार येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी आज दिनांक ५ सप्टेंबर रोजी पासून कर्तव्यावर हजर राहून बेमुदत उपोषणावर आहेत.
एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलमध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती सन २०१८ आणि २०१९ मध्ये झाली होती. पदभरतीमधील जाहिरात आणि नियुक्ती आदेशामध्ये स्पष्टपणे नमूद केलेले होते की, तीन वर्षे परिवीक्षा कालावधी पूर्ण झाल्यावर कर्मचाऱ्यांचे मूल्यमापन अहवाल समाधानकारक असल्यास कर्मचाऱ्यांना नियमित करून वेतनश्रेणी देण्यात येईल. परंतु सर्व कर्मचाऱ्यांचे कामांचे मूल्यांकन अहवाल जाऊनही परिवीक्षा कालावधी विलोपित झाला नाही. म्हणून सर्व कर्मचाऱ्यांनी प्रकल्प अधिकारी, प्रधान सचिव, आयुक्त आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र तसेच मुख्यमंत्री यांना वारंवार निवेदने दिली. परंतु, कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
त्यामुळे शिक्षक दिनी आज पासून ५ सप्टेंबर २०२३ रोजी पासून महाराष्ट्रातील सर्व एकलव्य शाळांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कर्तव्यावर हजर राहून बेमुदत उपोषण करत आहेत जो पर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तो पर्यंत उपोषण सुरू राहील असे त्यांनी सांगितले आहे.