ग्रामसभा न घेणे व पैशाची अफरातफर प्रकरण भोवले
गोंदिया (ता.11)– मागच्या वर्षभऱ्यापासून ग्रामसेवक व सरपंचांनी एकही ग्रामसभा घेतली नाही. यादरम्यान त्यांनी मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत निधीची अफरातफर केल्याची तक्रार गोंदिया तालुक्यातील मोरवाही येथील ग्रामपंचायत सदस्यांनी व गावकऱ्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली होती. सदर प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर त्यात दोषी आढळून आल्याने येथील वादग्रस्त ग्रामसेवक ललित सोनवणे यांना गुरुवारी( ता.7) जिल्हा परिषद प्रशासनातर्फे निलंबित करण्यात आले. तसेच याच प्रकरणात पैशाची अफरातफर केल्याप्रकरणी सरपंच वंदना मनोज पारधी व तत्कालीन प्रशासक सौ.दुबे यांच्याकडून शासकीय निधीची वसुली करण्याचे आदेश देण्यात आलेआहे.
मागच्या वर्षभरापासून ग्रामपंचायत प्रशासनाकडून एकही ग्रामसभा घेण्यात आली नाही. तसेच ग्रामपंचायत निवडणुकीच्या पूर्वी प्रशासक असलेल्या सौ. दुबे यांच्याकडून व सध्यस्थितीत पदावर असलेल्या सरपंच, ग्रामसेवक यांच्याकडून मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत निधीचा अपहार केली असल्याची तक्रार ग्रा.पं.सदस्य सुरेन्द्र रिनाईत, बुधराम भांडारकर, सौ.इंदू विनोद ठाकूर तसेच इतर गावकऱ्यांनी जील्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली होती. सदर तक्रारीची चौकशी करण्यासाठी पंचायत समिती स्तरावरील विस्तार अधिकारी आर.जे.बनसोड, कार्तिक चव्हाण, डी.आर.लंजे यांची संयुक्त समिती नेमण्यात आली. या समितीने सदर प्रकरणात ग्रामसेवक सोनवाणे,सरपंच सौ, वंदना मनोज पारधी व तत्कालिन प्रशासक सौ.दुबे दोषी असल्याचे नमूद केले आहे. तसेच ग्रामसेवक ललित सोनवाणे यांच्याकडून सहा लक्ष 82 हजार 439, प्रशासक सौ. दुबे यांच्याकडून पाच लक्ष 24 हजार 564 व सरपंच वंदना पारधी यांच्याकडून एक लक्ष 17 हजार 875 रुपये वसूल करण्यात यावे असे आपल्या चौकशी अहवालात नमूद केले आहे. सदर चौकशी अहवालावर कारवाई करीत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी येथील दोषी ग्रामसेवक ललित सोनवणे यांना गुरुवारी( ता.7) तात्काळ निलंबित केले आहे.तसेच बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता व तत्कालीन प्रशासक सौ. दुबे यांच्यावर विभागीय चौकशी व रक्कम वसुली तथा सरपंच सौ. पारधी यांच्यावर कलम 39 नुसार कारवाई तसेच शासकीय निधीची वसुली करण्यासंबंधीचे आदेश निर्गमित केले असल्याचे बोलले जात आहे.
ग्रामपंचायत मध्ये गावकऱ्यांना विश्वासात न घेता सरपंच व ग्रामसेवक आपल्या मनमर्जिने काम करीत असतात परंतू आता सरपंच, ग्रामसेवकावर करवाई होत असल्याने उर्वरित गावांतील सरपंच सचिवांचे धाबे दणाणले आहेत.
सदर प्रकरणाचा चौकशी अहवाल जिल्हा परिषद प्रशासनाकडे सादर करण्यात आला. त्यानुसार ग्रामसेवक सोनवणे यांना नुकतेच निलंबित करण्यात आले. सरपंच वंदना पारधी यांच्यावर शासकीय निधी वसुली व कलम 39 नुसार कारवाई तसेच तत्कालीन प्रशासक सौ.दुबे यांच्याकडून शासकीय निधीची वसुली व विभागीय चौकशी प्रशासनाकडे प्रस्तावित करण्यात आली आहे.
कार्तिक चौहान
चौकशी तथा विस्तार अधिकारी पं.स.गोंदिया.