* गावकऱ्यांचा फार्महाऊसला घेराव घालीत नोंदविला निषेध
* फार्म हाऊसवर बड्या व्यक्तीची उपस्थिती असल्याने पोलिसांची घटनास्थळी धाव
* फार्म हाऊस बंद करण्याची गावकऱ्यांची मागणी
गोंदिया – गोरेगांव तालुक्यातील सटवा गावाच्या हद्दीत असलेल्या गोंदिया येथील उद्योगपतीच्या फार्म हाऊसवर पार्टीकरिता आलेल्या तरुणांनी गावात चारचाकी वाहनांने फिरत हुल्लडबाजी करून गावकरी व गावातील पदाधिकारी यांच्याशी असभ्य वागणूक केल्याने शेकडो नागरिकांनी फार्म हाऊसला घेराव करीत आरोपींना बाहेर काढण्याची मागणी केली. ही घटना १० सप्टेंबर रोजी रविवारी सायंकाळ दरम्यान घडली. विशेष म्हणजे एका आमदाराची पत्नी यावेळी फार्म हाऊसवर उपस्थित असल्याने त्यांच्या सूचनेनुसार घटनास्थळी पोलिसांची कुमक मागवण्यात आल्याने घटनास्थळाला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते.
सटवा येथे अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या शेतीच्या जमिनीवर गोंदिया येथील एका अग्रवाल नामक उद्योगपतीने आलिशान फार्म हाऊस बांधले आहे. या फार्म हाऊसवर दिनांक १० सप्टेंबर रोजी वाढदिवसाची पार्टी आयोजित करण्यात आली होती. त्यानिमित्त आलेल्या काही तरुण व तरुणींनी चारचाकी वाहनांने गावात फेरफटका मारताना गाडीवर डीजे चे गाणे वाजवत हातवारे करत हुल्लडबाजी करीत जातं होते. त्यामुळे गावातील चौकात ग्रामपंचायत सदस्य ठाकूर यांनी त्यांना थांबऊन हे गाव आहे, यात अशाप्रकारची हुल्लडबाजी योग्य नाही. जे करायचे ते फार्म हाऊस च्या आत करा, असे प्रेमाने सांगून त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र या तरुणांनी या ग्रामपंचायत सदश्याशी वाद घालून त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला व तिथून ते फार्म हाऊसवर पोहोचले. या प्रकरणाची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. आपल्याच गावात येऊन हुल्लडबाजी करून गावातील पदाधिकाऱ्यांवर हात उगरण्याचा प्रकार गावकऱ्यांना असह्य झाल्याने किमान १०० ते १५० नागरिकांनी फार्म हाऊसवर समोर जमा होत घटनेचा निषेध व्यक्त करीत सदर तरुणांना बाहेर काढण्याची मागणी केली. विशेष म्हणजे यावेळी फार्म हाऊसवर वाढदिवस साजरा करण्यासाठी एका आमदाराची पत्नी ही उपस्थित होती. गावकऱ्यांचा जमावडा झाल्याचे लक्षात येताच त्यांनी या घटनेची माहिती आपल्या कार्यालयाला दिल्याने लगेच गोंदिया व गोरेगाव येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गावकऱ्यांना घटनास्थळावरून पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली.
या प्रकरणी परिस्थिती नियंत्रणात आली असली तरी गावकऱ्यांमध्ये या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. आज एका ग्रामपंचायत सदस्याला मारहाण करण्यात आली. उद्या गावातील महिला भगिनी यांनाही धोका होऊ शकतो असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. सदर फार्म हाऊस सुरू करण्यासाठी बांधकाम परवानगी कुणी दिली? बांधकामाचा नेमका उद्देश काय? असे अनेक प्रश्न गावकऱ्यांना पडले असून सदर फार्म हाऊसमुळे गावाची संस्कृती व शांतता धोक्यात आल्याने फार्म हाऊसवर बंदी घालण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. याप्रकरणी आज ११ सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत सदस्य ठाकूर यांच्या तक्रारीवरून फार्म हाऊस संचालक अग्रवाल यांच्याविरोधात तक्रार नोंदविण्यात आली आहे.