आरटीओ कार्यालयात शिबीर,99 चालकांना मोफत चष्मे वितरण
गोंदिया, दि.13 : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय गोंदिया मार्फत शुक्रवार व शनिवार 08 व 09 सप्टेंबर 2023 रोजी कार्यालयात नेत्र व अरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात सहयोग रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांद्वारे एकूण 250 वाहन चालकांचे रक्तविषयक व ब्लडप्रेशर इ. तपासण्या करुन डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्ला देण्यात आला.
शिबीरामध्ये उपस्थित वाहन चालकांची नेत्र तपासणी करण्यात आली व तपासणीदरम्यान नेत्रदोष आढळुन आलेल्या एकूण 99 वाहन चालकांना मोफत चष्मा वितरण करण्यात आलेले आहे. सदर शिबीरामध्ये विशेषत: प्रवासी बस, स्कूलबस, टॅक्सी/ रिक्षा, अवजड मालवाहू वाहन चालक, इतर शासकीय कार्यालयातील वाहन चालक तसेच वाहन चालविणारे ज्येष्ठ नागरीक यांनी नेत्र व आरोग्य तपासणी शिबीराचा लाभ घेतलेला आहे. शिबीरादरम्यान सर्व तपासण्या हे पूर्णपणे मोफत करण्यात आल्या. सदर शिबीरामध्ये सहयोग रुग्णालय, गोंदिया येतील ड्रॉक्टरांचे चमु कार्यालयात उपस्थित होते.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबीरामध्ये कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.