मोफत कॅन्सर तपासणी ओ.पी.डी.तून गोरगरिबांना चांगली सुविधा मिळेल – मंत्री हसन मुश्रीफ

0
6

कोल्हापूर, दि.13:  छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयामध्ये सुरु झालेल्या मोफत कॅन्सर तपासणी ओपीडीतून गोरगरिबांना चांगली सुविधा मिळेल असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. सीपीआरमध्ये बाह्यरुग्ण विभाग इमारतीत मोफत होमिओपॅथिक तपासणी ओ.पी.डी. क्र.111 व कॅन्सर तपासणी ओ.पी.डी. क्र.119 चे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शुभारंभ झाले.

यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले की, सद्यस्थितीत विविध प्रकारच्या कॅन्सरच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जिल्ह्यात सुविधा नसल्याने कर्करोगी रूग्णांना उपचारासाठी जिल्ह्याबाहेरील पुणे, मुंबई व चांगल्या सुविधा मिळणाऱ्या खर्चिक ठिकाणी उपचारासाठी जावे लागते. आता, याठिकाणी सर्वसामान्यांना कॅन्सर प्रकारातील तोंड, घसा, फुफ्फुस, स्तन, गर्भाशय, आतडे, किडणी व मुत्राशय कर्करोग यावरील उपचारांचा लाभ मिळणार आहे. तसेच येथील उपचार फक्त बुधवारीच सुरू न ठेवता सोमवार ते शुक्रवार सुरू करण्याबाबत वैद्यकीय अधिष्ठाता श्री. गुरव यांना त्यांनी सूचना दिल्या.

अधिष्ठाता डॉ. गुरव यांनी शासकीय रूग्णालयातील होमिओपॅथिक तपासणीची ओ.पी.डी. ही राज्यात प्रथमच छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात उपलब्ध करून दिल्याबद्दल वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांचे आभार मानले. सोमवार ते शुक्रवार दुपारी 3 ते 5 या वेळेत रूग्णांची तपासणी करून मोफत औषध दिली जाणार आहेत. तसेच रुग्णांना कर्करोगावर मोफत  तपासणी व उपचार उपलब्ध करून दिल्याबद्दल मंत्री हसन मुश्रीफ यांचे आभार मानले.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांनी अशा रुग्णांनी नियमित शिजवलेले अन्न खावे व नियमित व्यायाम करून आजारांना दूर करावे असे सांगितले. कर्करोगाच्या सर्वसाधारण लक्षणांवर दुर्लक्ष झाल्यास गंभीर आजार उद्भवतो म्हणून वेळेत तपासणी व निदान करावे असे पुढे सांगितले.

कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या कार्यकारी संचालिका डॉ. रेश्मा पवार यांनी कर्करोगावर छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात कॅन्सर तज्ज्ञामार्फत मोफत तपासणी नियमित सुरू राहून कर्करोगावर महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत कॅन्सर उपचारासह निदान करून रूग्णास जीवदान देण्यात येणार असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमाला प्रमुख अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, वैद्यकीय अधिक्षक डॉ. शिशीर मिरगुंडे, वैद्यकीय उपअधिक्षक डॉ. गिरीष कांबळे, कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या कार्यकारी संचालिका डॉ. रेश्मा पवार, कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर्स, कोल्हापूर न्यू इंटीग्रेटेड होमिओपॅथिक असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. शितल पाटील, सेक्रेटरी डॉ. चेतन गुरव तसेच छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातील वैद्यकीय परिचारिका व कर्मचारी तसेच रूग्णांचे नातेवाईक यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ताज मुल्लाणी तर आभार प्रदर्शन डॉ. मिरगुंडे यांनी केले.