जिल्ह्यातील 868 गावांमध्ये होणार श्रमदानातून स्वच्छता

0
6

सर्व अधिकारी कर्मचार्यांसह नागरीकांनी सहभागी होण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल पाटील यांचे आवाहन

गोंदिया, ता. 30 : वैयक्तिक स्वच्छतेसह सार्वजनिक स्वच्छता राखणे, हे प्रत्येक नागरिकांचे आद्य कर्तव्य आहे. स्वच्छतेची लोक चळवळ निर्माण करण्यासाठी संपूर्ण देशात ‘स्वच्छता ही सेवा’ हा उपक्रम राबविण्यात येत असून त्याअंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ‘स्वच्छांजली’ याउपक्रमांर्तगत उद्या (ता. १ ) संपूर्ण जिल्ह्यातील ८६८ गावांमध्ये श्रमदानातून स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात अधिकारी कर्मचार्यांसह नागरीकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषद गोंदियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे.
15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान ‘स्वच्छता ही सेवा’ हा उपक्रम राबविण्याचे शासनाचे निर्देश आहेत. दरम्यान संपूर्ण देशात १ ऑक्टोबर रोजी एक तास श्रमदानातून स्वच्छता करण्याचे माननीय प्रधानमंत्री भारत सरकार यांनी आवाहन केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 868 गावांमध्ये श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविण्याचे आदेश निर्गमित करण्यात आल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता नरेश भांडारकर यांनी कळविले आहे. दरम्यान जिल्हास्तरावर गोंदिया पंचायत समिती अंतर्गत कारंजा या ठिकाणी सकाळी आठ वाजता श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे यात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विषय समितीचे सर्व सभापती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेचे सर्व विभागप्रमुख कर्मचारी अधिकारी कर्मचारी सहभागी होणार आहेत. आपले गाव स्वच्छ सुंदर व आरोग्य संपन्न व्हावे, यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपल्या गावातील सर्व सार्वजनिक ठिकाण, बस स्थानक, चावडी, शासकीय कार्यालय, शाळा, अंगणवाडी, जलस्रोतांच्या ठिकाणात स्वच्छता मोहीम राबवून उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषद गोंदियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी केली आहे.

२ ऑक्टोबरला शपथ
स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत २ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील सर्व कार्यालयांमध्ये महात्मा गांधी यांना अभिवादन करून स्वच्छतेची शपथ घेण्यात येणार आहे याठिकाणी नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे