गोंदिया, ता. 2 : महात्मा गांधी यांनी ज्या भारताचे स्वप्न पाहीले होते त्यामध्ये फक्त राजकीय स्वातंत्र्य नव्हते; तर त्यासोबत एक स्वच्छ व विकसीत देशाची कल्पना पण होती. महात्मा गांधींनी पारतंत्र्याच्या जोखडातून भारतमातेला मुक्त करून स्वातंत्र्य मिळवून दिले. आता भारतमातेला अस्वच्छतेतून मुक्ती देवून देशाची सेवा करणे आपले आद्य कर्तव्य आहे. त्यासाठी स्वच्छतेच्या प्रति जागरूक रहा, असे आवाहन गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी केले.
जिल्हा परिषद प्रशासकीय इमारत परिसरात महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांना त्यांच्या जयंतीनिमीत्त आज (ता.2) अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) नरेश भांडारकर, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (महीला व बालकल्याण) संजय गणवीर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. महेंद्र गजभिये, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मनरेगा) दिनेश हरीणखेडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार, साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल, कृषी विकास अधिकारी महेंद्रकुमार मडामे, कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा) सुमित बेलपत्रे, कार्यकारी अभियंता (समग्र शिक्षा) जीवनेश मिश्रा यावेळी उपस्थित होते. पाटील पुढे म्हणाले, ‘की मी घाण करणार नाही, आणि कुणालाही घाण करू देणार नाही. हा संकल्प प्रत्येक व्यक्तीने आत्मसात करायला हवा. स्वच्छतेची सुरवात स्वत:पासून, स्वत:च्या कुटूंबापासून करून, आपली गल्ली, वॉर्ड, वस्ती आणि मुख्य म्हणजे कार्यस्थळ सुध्दा स्वच्छ ठेवायला हवे.’ राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहाद्दूर शास्त्री यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून ‘स्वच्छ भारत दिवस’ या कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. दरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांना आठवडयातून दोन तास श्रमदान करून स्वच्छतेचा संकल्प पूर्ण करण्याची शपथ दिली. याप्रसंगी तबाखू मुक्त जीवन करण्याची शपथ सुध्दा घेण्यात आली. संपूर्ण देशात स्वच्छता ही सेवा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हयात 1 ऑक्टोबर रोजी मोठयाप्रमाणात श्रमदान करण्यात आले. ही आंनदाची बाब आहे. स्वच्छता ही व्यक्तीचे आत्मदर्शन घडविते. आपला सर्वाधिक वेळ प्रशासकीय भवनामध्ये जातो. त्यामुळे हा परिसर नेहमीच स्वच्छ राहील यासाठी, प्रत्येक कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेचा संकल्प तडीस नेण्याचे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) नरेश भांडाकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहीती, शिक्षण व संवाद तज्ञ अतुल गजभिये यांनी केले. दरम्यान जिल्हा परिषद परिसरात श्रमदान करून प्लास्टीकचे संकलन करण्यात आले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे सहायक प्रशासन अधिकारी श्री. मडावी, स्वीय सहायक यज्ञेश मानापुरे, शिक्षण विभागाचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी सौरभ अग्रवाल, माहीती, शिक्षण व संवाद तज्ञ राजेश उखळकर, शालेय स्वच्छता तज्ञ भागचंद रहांगडाले, पाणी गुणवत्ता तज्ञ मुकेश त्रिपाठी, मुल्यमापन व सनियंत्रण तज्ञ विशाल मेश्राम, सर्व शिक्षा अभियानाचे जिल्हा समन्वयक बाळकृष्ण बिसेन, प्रोग्रामर नितेश खंडेलवाल, सहायक कार्यक्रम अधिकारी दिलीप बघेले, मनोज शेदमारे, जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठयासंख्येने उपस्थित होते.
प्लास्टीक संकलन
स्वच्छ भारत दिवस निमीत्ताने जिल्हा परिषद परिसरात प्लास्टीक कचऱ्यांच्या संकलनावर भर देण्यात आला. याप्रसंगी प्रशासकीय इमारत परीसरात इतरत्र पसरलेला केरकचरा विशेषत: प्लास्टीक पिशव्या, बॉटल्स, प्लास्टीकचे कप, ग्लास आणि इतर वस्तू गोळा करून त्याचे व्यवस्थापन करण्यात आले. दरम्यान परिसरातील गवत, खुरटे, पाळापाचोळा काढून परिसर स्वच्छ करण्यात आला आहे.