गोंदिया : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या वार्षिक वेळापत्रकानुसार ३० जून रोजी जंगल सफारी बंद करण्यात आली. १ ऑक्टोबरपासून तीन महिन्यांनी पर्यटकांसाठी ही जंगल सफारी सुरू झाली आहे. मात्र व्याघ्र प्रकल्पांतर्गत असलेले कोका अभयारण्य सततच्या पावसामुळे पर्यटकांसाठी खुले होऊ शकले नाही. ते उघडण्यासाठी आणखी काही दिवस लागतील.
कोका अभयारण्य जिल्हा मुख्यालयापासून २० किमी अंतरावर आहे. या अभयारण्यात वाघ, हरीण, बिबट्या, अस्वल यासह विविध वन्यप्राण्यांचे वास्तव्य आहे. घनदाट जंगल आणि अनेक जलाशय आहेत. त्यामुळे पर्यटक कोका अभयारण्याकडे आकर्षित होत आहेत. पावसाळा सुरू होताच ३० जून ला त्यानंतर तीन महिन्यांनी १ ऑक्टोबरला जंगल पुन्हा पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. मात्र यावेळी सप्टेंबर महिन्यात दोन्ही जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. यापुढेही पावसाची शक्यता कायम आहे. त्यामुळे अभयारण्याचे रस्ते पुरते खराब झाले आहेत. सर्वत्र पाणीच पाणी आणि चिखल आहे. त्यामुळे पर्यटकांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पाऊस न आल्यास येत्या आठवडाभरात कोका अभयारण्यात जंगल सफारी सुरू होऊ शकते. अन्यथा १५ ऑक्टोबरपासून पर्यटकांना जंगलात नक्कीच जाता येणार आहे.
दरम्यान, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पांतर्गत पिटेझरी आणि गोठणगाव गेट पासून जंगल सफारी सुरू झाली आहे. पावसाच्या परीस्थितीनुसार पर्यटन त्याची स्थिती पाहून नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग पर्यटन ऑफलाईन पध्दतीने सुरु राहील. त्या अनुषंगाने येथील पर्यटनातून स्थानिकांना जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध होईल यासाठी व वनसंरक्षण आणि संवर्धन यात स्थानिकांचा सहभाग वाढविण्यासाठी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या मंजूर व्याघ्र संवर्धन आराखड्या प्रमाणे नवेगाव- नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील नागझीरा व नविन नागझीरा अभयारण्या अंतर्गत ( नागझिरा ब्लॉक मध्ये) येत असलेल्या पिटेझरी, मंगेझरी, चोरखमारा १ व चोरखमारा- २ या प्रवेशव्दारा वरून पुढील आदेशापर्यत पर्यटनाकरीता नवेगाव-नागझिरा व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानात नोदणीकृत जिप्सी व तत्सम पर्यटन वाहन अनिवार्य करण्यात आले आहे.
पाऊस थांबल्यावरच सफारी सुरू होणार
कोका अभयारण्यात जंगल सफारी सुरू करण्याची तयारी करण्यात आली आहे. मात्र पावसामुळे काही रस्ते ओले आहेत. चिखल पण आहेच, अशा परिस्थितीत काही दिवस थांबून कोरड झाल्यानंतरच जंगल सफारी सुरू केली जाईल.मात्र नवीन नागझीरा चे पिटेझरी, मंगेझरी, चोरखमारा १ व चोरखमारा- २ या प्रवेशव्दारा वरून ऑफलाईन प्रवेश सुरु राहणार आहे, असे नवेगांव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रचे सहायक उपवनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक पवन झेप यांनी सांगितले.