5 नोव्हेंबरला मतदान : आचारसंहिता लागू
गोंदिया, दि.4 : राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे 3 ऑक्टोबर 2023 चे आदेशानुसार माहे जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती, नव्याने स्थापित व सन 2022 मध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे निवडणुका न होऊ शकलेल्या ग्रामपंचायतींच्या (सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणक प्रणालीद्वारे तसेच ग्रामपंचायतीतील रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी पारंपारिक पध्दतीने राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम 3 ऑक्टोबर 2023 रोजी जाहीर झाला आहे. त्यानुसार गोंदिया जिल्ह्यातील आठ तालुक्यातील ग्रामपंचायत निहाय एकूण 4 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व 11 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
त्यानुसार तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करण्याचा दिनांक 6 ऑक्टोबर 2023. नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक 16 ते 20 ऑक्टोबर 2023, वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत. नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक 23 ऑक्टोबर 2023, वेळ सकाळी 11 वाजेपासून छाननी संपेपर्यंत. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक 25 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत. निवडणूक चिन्ह नेमुन देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक 25 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 3 वाजेनंतर. मतदानाचा दिनांक 5 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 7.30 वाजेपासून ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत. मतमोजणी व निकाल घोषित करण्याचा दिनांक 6 नोव्हेंबर 2023 व नक्षलग्रस्त तसेच दुर्गम भागासाठी दिनांक 7 नोव्हेंबर 2023. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक 9 नोव्हेंबर 2023 पर्यंत.
ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोटनिवडणुका असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये 3 ऑक्टोबर 2023 पासून निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील, याची सर्व कार्यालय प्रमुखांनी नोंद घ्यावी. असे उपजिल्हाधिकारी (सामान्य) चंद्रभान खंडाईत यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे