निकृष्ठ बांधकामामुळे चिचगावटोल्यातील निर्माणाधीन जलकुंभ जमीनदोस्त

0
9

गोदिया : निर्माणाधीन जलकुंभाचे बांधकाम मानक व नियमानुसार होत नसल्याचा कारणावरून ८० टक्के बांधकाम झालेला जलकुंभ जमीनदोस्त करण्याचा प्रकार गोरेगांव तालुक्यातील चिचगावटोला येथे उघडकीस आला आहे.प्रत्येक नागरिकाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे हा शासनाचा उद्देश असून गोंदिया जिल्ह्यात ४७६ कोटी खर्चातून जवळपास २५० गावांमध्ये शासनाच्या जलजीवन मिशनअंतर्गत जलकुंभांचे निर्माण करण्यात येत आहे. मात्र, या निर्माणाधीन कार्यालाही भ्रष्टाचाराचे गालबोट लागले आहे. असाच प्रकार गोरेगांव तालुक्यातील चिचगावटोला गावात उघडकीस आला असून याप्रकरणी जिल्हा परिषद सदस्यांनी जिल्हा परिषदेकडे ६ महिन्यांपूर्वी तक्रार केली होती.त्या तक्रारीच्या आधारे सदर कंत्राटदाराला टाकीचे बांधकाम करतांना चुकीच्या पध्दतीने बांधकाम झाल्याचे निदर्शनास आणून देत तिथूनच बांंधकाम तोडून नव्याने काम करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या होत्या.

परंतु  जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या सुचनेनंतरही कंंत्राटदाराने बांधकाम सुरुच ठेवल्याचे जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र कटरे यांनी विभागाच्या लक्षात आणून दिले.८० टक्के बांधकाम पूर्ण झाल्यानंतर परत जलकुंभाची पाहणी केली. त्या जलकुंभाच्या कामात दोष असल्याने निर्माणाधीन बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले.तसेच सबुरी कन्स्ट्रक्शन कंपनीला ५० हजार रुपये दंड ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ठोठावला आहे. गोंदिया जिल्ह्यातील जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या इतर पाणीटाकींचीही तपासणी केल्यास अनेक बांधकामांत दोष आढळून येण्याची शक्यता आहे.

तक्रार केली होती, सखोल चौकशी करा

४७६ कोटी रुपयांच्या निधीतून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जिल्ह्यात जलकुंभ बांधकामाचे काम सुरू आहे. मात्र चिचगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुरू असलेले बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होते. ज्याबाबत तक्रार केली होती. निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे ही पाण्याची टाकी पूर्ण होण्यापूर्वीच जेसीबीने पाडण्यात आली. त्याचप्रमाणे या योजनेअंतर्गत इतर ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामांचीही सखोल तपासणी करण्याची गरज आहे. शासनाचे जे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे त्यासाठी इतर कोणी नसून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचा दुर्लक्षपणा जबाबदार धरले पाहिजे. – जितेंद्र कटरे, जि.प.सदस्य, शहारवानी, गोंदिया

निर्देशानंतरही कंत्राटदाराने दुर्लक्ष केल्याने बांधकाम पाडले

मंजूर स्ट्रक्चर व मानकांनुसार जलकुंभाचे बांधकाम नव्हते.त्यामुळे पाहणी दरम्यान संबंधित कंत्राटदाराला चुकीचे बांधकाम पाडून नवीन बांधकाम करण्याची सूचना देऊनही त्याने जुन्याच बांधकामानुसार टाकीचे काम सुरू ठेवल्याचे लक्षात आल्याने कंत्राटदारास जलकुभं पाडण्याचे निर्देश देण्यात आले,त्यानुसार पाडण्यात आले असून कंपनीवर दंड ठोठावण्यात आला आहे.कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुमित बेलपत्रे यांनी सांगितले.