महावितरणच्या 39 कर्मच-यांनी केला नेत्रदानाचा संकल्प

0
15
वाढदिवसाच्या शुभेच्छा

नागपूर, दि. 4 ऑक्टोबर 2023: वीजेच्या माध्यमातून सर्वसामान्याचे आयुष्य प्रकाशमय करणा-या महावितरणच्या काटोल विभागातील 39 कर्मचा-यांनी मरणोपरांत नेत्रदान करण्याच्या संकल्प केला. रौशनी फाऊंडेशन नागपूरतर्फे कार्यकारी अभियंता काटोल आणि माधव नेत्रालय, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने महावितरणच्या काटोल विभागीय कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित नेत्रदान जागरूकता आणि मोफत नेत्र तपासणी शिबिराप्रसंगी हा संकल्प करण्यात आला.

शिबिराचे प्रास्ताविकातून रौशनी फाऊंडेशनचे यादव लक्षणे यांनी रौशनी फाऊंडेशनचा मरणोपरांत नेत्रदान जागरूकता, उद्देश आणि कार्य याबाबत माहिती दिली. तसेच नेत्रदानाची आवश्यकता व महत्व सांगून मरणोपरांत नेत्रदान करण्याचे आवाहन केले. तर राजेंद्र जैन आणि गजानन पाटील ह्यांनी नेत्रदानाविषयी सखोल माहिती देऊन उपस्थितांच्या शंकांचे समाधान केले, तर माधव नेत्रालयचे अनिरुद्ध सोमण ह्यांनी जास्तीत जास्त लोकांनी मरणोपरांत नेत्रदान करण्याचे आवाहन यावेळी केले. याप्रसंगी बोलतांना कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि काटोल विभागाचे कार्यकारी अभियंता दिपक अघाव यांनी सांगितले की, जास्तीतजास्त लोकांनी मरणोपरांत नेत्रदान केल्यास नेत्रहीन व्यक्तींचे जीवन सुकर करणे शक्य होईल.

याप्रसंगी महावितरणच्या 39 कर्मचाऱ्यांनी नेत्रदान संकल्प पत्र भरून दिले. तसेच 60 व्यक्तींची नेत्र तपासणी करण्यात आली. माधव नेत्रालयतर्फे अनिरुद्ध सोमण, आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थितांची नेत्र तपासणी केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रौशनी फाऊंडेशनचे अगळे, साहू, वनकर, टेकाडे, भस्मे, महावितरणचे शेंडे, काकडे, खरबडे, कडू, यांचेसह राठी व ताजने यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे संचालन यादव लक्षणे यांनी तर आभार प्रदर्शन भस्मे ह्यांनी केले.