गोंदिया (खेमेंद्र कटरे) : स्थानिक पालकमंत्र्यांच्याबाबतीत गोंदिया जिल्हा नेहमीच दुर्दैवी ठरला आहे.जिल्हा निर्मितीनंतर महादेवराव शिवणकर, राजकुमार बडोले आणि परिणय फुके वगळता नेहमी इतर जिल्ह्यातील नेतेच पालकमंत्री म्हणून लाभले. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर आत्तापर्यंत चार वर्षांच्या काळात गोंदिया जिल्ह्याला पाचवे पालकमंत्री मिळाले.
गोंदिया जिल्हा राज्याच्या पूर्व टोकावर आहे. निसर्गसंपन्न आणि जंगलव्याप्त असल्यामुळे या जिल्ह्याला विशेष स्थान आहे. मात्र नक्षलग्रस्त आणि आदिवासीबहूल असल्यामुळे या जिल्ह्याकडे राज्य शासनाचे कायमच दुर्लक्ष झाले. प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे वजनदार नेते असूनही त्याचा फारसा लाभ जिल्ह्याला झाला नाही. महादेवराव शिवणकर राज्याचे मंत्री असताना भंडारा जिल्ह्याची विभागणी झाली. गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून शिवणकर यांनी प्रभावशाली भूमिका बजावली होती. त्यानंतरच्या काळात मात्र जिल्ह्यावर कायमच बाहेरचे पालकमंत्री लादण्यात आले. या पूर्वीचे पालकमंत्री तर वर्षातून फक्त झेंडावंदन करण्याकरिताच येत होते. त्यामुळे त्यांना ‘झेंडामंत्री’ अशी बिरुदावलीदेखील लाभली.
गोंदिया जिल्ह्याचे सर्वाधिक काळ पालकमंत्री राहिलेले अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.तर युतीच्या काळात जिल्ह्याच्या पालकमंत्री असलेले राजकुमार बडोले यांनी शेवटच्या सहा महिन्यात मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
युती सरकारच्या काळात भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन गोंदिया जिल्हा अस्तित्वात आला. पहिले पालकमंत्री प्रा. महादेवराव शिवणकर हे होते. त्यानंतर मात्र गोंदिया जिल्ह्याला स्थानिक पालकमंत्री लाभले नाही. २०१४ मध्ये भाजप-शिवसेना युतीचे सरकार सत्तेवर आले तेव्हा अर्जुनी-मोरगाव मतदारसंघातून दुसeऱ्यांदा निवडून आलेले राजकुमार बडोले सामाजिक न्यायमंत्री झाले. त्यांना गोंदियाचे पालकमंत्री करण्यात आले. १४ वर्षांनंतर मूळ जिल्ह्यातील व्यक्ती पालकमंत्री झाले होते. मात्र त्यांना शेवटच्या सहा महिन्यात आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर डॉ. परिणय फुके यांना गोंदियाचे पालकमंत्रिपद मिळाले होते. सहा महिन्यानंतर विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले. आणि पुन्हा गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी अनिल देशमुख यांच्याकडे आली. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या सत्ताकाळात देशमुख गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री होते.जिल्ह्याचे पालकमंत्री पद साभांळणारे अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. देशमुखांनी मंत्रीपदाचा राजिनामा दिल्यानंतर नवाब मलीक यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोपवण्यात आले. मात्र तेदेखील मंत्रीपदावरून पायउतार झाल्याने मविआ सरकार असेपर्यंत प्राजक्त तनपुरे पालकमंत्री होते.त्यानंतर मागच्या वर्षी 30 जून रोजी राज्यात सत्तांतर झाले.राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे गोंदियाचे पालकमंत्रीपद आले.सरकारची वर्षपूर्ती झाली असताना पुन्हा सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सहभागी झाला.तेव्हापासून नव्या पालकमंत्र्याची जिल्ह्याला वाट होती.त्यानुसार आज 4 आँक्टोंबरला जाहिर झालेल्या यादीनुसार गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडे गोंदिया जिल्ह्याचे पालकत्व आल्याने चार वर्षांत पाच पालकमंत्री गोंदिया जिल्ह्याला लाभले आहे.
गोंदियात यापूर्वी दत्ता मेघे, विजयकुमार गावित, नाना पंचबुद्धे यांनीही जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
गोंदियाचे सर्वाधिक काळ पालकमंत्री राहण्याचा बहुमान अनिल देशमुख यांनाच मिळाला. ते १२ वर्षे गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री होते. गोंदिया जिल्हा आणि पालकमंत्री अनिल देशमुख हे समीकरणच झाले होते. देशमुखांची नाळ गोंदिया जिल्ह्याशी चांगलीच जुळली होती. आघाडीचे सरकार आले की, खेड्यापाड्यातील व्यक्ती आपला पालकमंत्री अनिल देशमुखच होणार असे ठामपणे सांगायचे. या दरम्यान, देशमुख फक्त शासकीय ध्वजारोहण व विशेष कार्यक्रमप्रसंगीच येत असल्याने त्यांची झेंडामंत्री म्हणून ओळख विरोधकांनी तयार केली होती. मात्र जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि नेत्यांशी त्यांचा कायम संपर्क होता.
मुनगंटीवारही बैठक पालकमंत्री निघाले
सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी दिल्यानंतर त्यांंनी आपल्या वर्षभराच्या कार्यकाळात 3- 4 बैठकांच्या निमित्तानेच गोंदियाला भेट दिली.झेंडावंदनाला मात्र त्यांनी हजेरी लावली नाही.पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्या डीपीडीसी बैठकीला दिवाळीपु्र्वी आले.त्यानंतर ते मार्चमध्ये डीपीडीसीच्या बैठकीला आले.नागझिरा व्याघ्रप्रकल्पात वाघ सोडायला आले असे महत्वाचे इव्हेंंट वगळले तर मुनगंटीवारांनीही जिल्ह्याकडे पालकमंत्री म्हणून काही खास न केल्याने ते बैठक व इव्हेंटमंत्रीच ठरले.