गोंदिया:परिश्रमातूनच यश साधले जाते. ध्येय मोठे ठेवा, पण सुरुवात लहानांपासूनच करा. जे मिळेल ते काम प्रामाणिकपणे करून त्यातून स्वतःला सिद्ध करीत यशस्वी व्हा, असा सल्ला गोंदिया येथे आयोजित खासदार नोकरी महोत्सवात खासदार सुनील मेंढे यांनी दिला. जवळपास 2196 उमेदवारांना नोकरीचे नियुक्ती पत्र देण्यात आले.
गोंदिया येथे खासदार नोकरी महोत्सवाचे आयोजन 13 रोजी करण्यात आले होते. यावेळी महोत्सवाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. खासदार सुनील मेंढे यांच्या संकल्पनेतून प्रत्यक्षात उतरलेला हा नोकरी महोत्सव स्वर्गीय बाबुराव मेंढे स्मृती सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबविला गेला. या महोत्सवाचे उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, यशुलाल उपराडे, नेत्राम कटरे, संजय टेंभरे, संजय कुलकर्णी, सुनील केलंका, गोडघाटे सर, भावनाताई कदम, सीताताई रहांगडाले, शालिनीताई डोंगरे, धनलाल ठाकरे, संजय बारेवार, मनोज बोपचे, गिरिधारी बघेले, अमित झा, नरेंद्र बाजपेयी, रत्नदीप दहिवले, लक्ष्मण भगत, गजेंद्र फुंडे, शंभू शरण ठाकूर, जीवन जगणीत उपस्थित होते. दीप प्रज्वलानंतर महोत्सवाची सुरुवात झाली. प्रास्ताविक करताना शुभांगी मेंढे यांनी महोत्सव आयोजना मागची भूमिका स्पष्ट करीत, हा नोकरी महोत्सव तरुणाईचे हात बळकट करण्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न असल्याचे सांगितले. मार्गदर्शन करताना जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी, घर आणि गाव न सोडण्याची मानसिकता बदलणे गरजेचे असल्याचे सांगितले. जोपर्यंत घर सोडणार नाही तोपर्यंत तुमच्या पंखांमधील बळ तुम्हाला कळणार नाही. त्यामुळे मिळेल ती संधी स्वीकारा आणि पुढे जा असे त्यांनी सांगितले.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना खासदार सुनील मेंढे यांनी आज यशस्वी म्हणून समाज मान्यता असलेल्या अनेकांची उदाहरणे दिली. मात्र या यशामागील परिश्रम ओळखण्याचा सल्लाही त्यांनी दिला. यश हे सहज मिळत नाही. त्यासाठी जिद्द आणि चिकाटी असावी लागते. मी आणि माझे घर या मानसिकतेत बदल करून जगाच्या पाठीवर कुठेही जाण्याची तयारी ठेवणारा तरुणच यशस्वी होऊ शकेल असे ते म्हणाले. कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही लहानांपासूनच होते. त्यामुळे ध्येय प्रचंड मोठे असले तरी सुरुवात लहानांपासून करून नंतर स्वतःला आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर सिद्ध करा असे सांगत नोकरी महोत्सवात सहभागी झालेल्या तरुण-तरुणींना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
या नोकरी महोत्सवासाठी जवळपास 11000 बेरोजगार तरुण तरुणींनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केली होती. यातील 5290 उमेदवार प्रत्यक्ष मुलाखतींना हजर झाली आणि त्यातील 2196 उमेदवारांना नोकरीचे पत्र देण्यात आले. सकाळपासूनच उमेदवारांनी महोत्सवाच्या ठिकाणी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी आलेल्या उमेदवारांच्या नाश्त्याची आणि औषधोपचाराची पूर्ण व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयंत शुक्ला आणि संजय निंबेकर यांनी केले.